20 January 2021

News Flash

पुण्यात माहिती अधिकार कार्यकर्त्याची हत्या

मुळशी तालुक्यातील घाटात त्यांचा मृतदेह सापडला असून विनायक शिरसाट यांनी अवैध बांधकामांविरोधात आवाज उठवला होता

आठ दिवसांपासून बेपत्ता असलेले पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक शिरसाट (वय ३२) यांची हत्या झाल्याचे समोर आले आहे. मुळशी तालुक्यातील घाटात त्यांचा मृतदेह सापडला असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. विनायक शिरसाट यांनी अवैध बांधकामांविरोधात आवाज उठवला होता.

शिवणे येथील उत्तमनगर परिसरात राहणारे विनायक शिरसाट हे ५ फेब्रुवारीपासून बेपत्ता होते. त्यांच्या भावाने यासंदर्भात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली होती. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला होता. सोमवारी दुपारी पोलिसांनी शिरसाट यांचे मोबाइल लोकेशन ट्रेस केले असता त्यांचा मोबाईल मुठा गावाच्या हद्दीत असल्याचे समोर आले. या आधारे पोलिसांनी मुठा गाव आणि लगतच्या परिसरात शोध घ्यायला सुरुवात केली. या दरम्यान पिरंगूट ते लवासा मार्गावरील घाटात विनायक शिरसाट यांचा मृतदेह सापडला. त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून त्यांची हत्या झाल्याचे समजते. शिरसाट यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

विनायक शिरसाट हे राजकीय पक्षाशी देखील संबंधित होते. माहिती अधिकाराच्या माध्यमातून त्यांनी वडगाव धायरी आणि परिसरातील अवैध बांधकामांविरोधात आवाज उठवला होता. शिरसाट यांच्या कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत त्यांच्याशी चर्चा केली. या प्रकरणी तेलंगणातून दोन जणांना अटक केल्याची माहितीही पोलिसांनी कुटुंबीयांना दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2019 8:39 am

Web Title: rti activist vinayak shirsat found dead in mulshi police suspect murder
Next Stories
1 जागा काँग्रेसकडे, भेट राष्ट्रवादीच्या नेत्याची!
2 १० हजार ८०० जागांवरच शिक्षक भरती?
3 पाच वर्षांतील २५ हजार बाक कुठे गेले?
Just Now!
X