दोन दिवसांत ५५९ वाहन चालकांवर कारवाई
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सहा पथके नेमण्यात आली असून, या पथकांनी दोनच दिवसांत महामार्ग पोलिसांच्या सोबतीने ५५९ वाहन चालकांवर कारवाई केली आहे. कारवाईत दोन लाख ७४ हजार रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आला आहे.
द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलापर्यंत पुणे आरटीओची पथके कार्यरत करण्यात आली आहेत. महामार्ग पोलिसांच्या पथकाचाही त्यात समावेश आहे. मार्गावरील वाढत्या अपघातांना आळा घालण्याच्या उद्देशाने बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारावाई केली जात आहे. अतिवेगात वाहन चालविणे, लेन कटिंग करणे, सीटबेल्ट न वापरणे, क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करणे याबाबत ही कारवाई केली जात आहे. मागील दोन दिवसांमध्ये सर्वाधिक कारवाई अतिवेगात वाहन चालविणाऱ्यांवर करण्यात आली.
आरटीओने अशा १३५ वाहन चालकांवर, तर महामार्ग पोलिसांनी १९५ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली.
कारवाईबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी सांगितले, की द्रुतगती मार्गावरील ही कारवाई यापुढेही सुरू ठेवण्यात येणार आहे. शनिवार व रविवारीही ती सुरू राहील.