पिंपरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील ‘पॉईंट ४’ या संगणक प्रणालीमध्ये येणाऱ्या अडथळ्यांमुळे नागरिकांची कामे सातत्याने खोळंबून राहत आहेत. त्यामुळे विविध कामांसाठी आरटीओ कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना रोजच तासन-तास रांगेत तिष्ठत उभे रहावे लागत आहेत. तसेच बाहेर गावांवरुन येणाऱ्या नागरिकांची कामे वेळेवर होत नसल्याने त्यांना हेलपाटे मारावे लागत असल्याने ते त्रस्त झाले आहेत.

केंद्र सरकारने आरटीओ कार्यालयातील कामकाजासाठी नवी संगणक प्रणाली वापरण्याचा निर्णय घेतला आहे. पिंपरी आरटीओ कार्यालयातील संगणक प्रणालीचे काम करण्यासाठी वाहन परवाना देण्याचे कामकाज वगळता अन्य कामकाज कामकाज बारा दिवस बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर १३ फेब्रुवारीपासून पॉईंट ४ या संगणक प्रणालीचा वापर ऑनलाईन कामकाजासाठी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

वाहनांचे पासिंग पावती, गाडय़ांची माहिती, पथ कर, पर्यावरण कर आदी कामकाज ऑनलाईन पद्धतीने करण्यास सुरुवात करण्यात आली असली तरी सदोष यंत्रणेमुळे ऑनलाईन कामकाज वाहन मालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पैसे भरल्यानंतर संगणक प्रणालीमधून पावत्या वेळेवर छापून मिळत नाहीत. त्यामुळे वाहन मालकांच्या रांगा वाढत जात आहेत. सकाळी ९ वाजल्यापासून वाहन मालकांच्या आरटीओ कार्यालयात रांगा लागतात, तरीही कामे वेळेवर होत नाहीत. आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठीही प्रणाली नवीन असल्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

पिंपरी आरटीओ कार्यालयामध्ये खेड, आंबेगाव,चाकण, लोणावळा, जुन्नर, मंचर आदी भागातील वाहन मालक विविध कामांसाठी हेलपाटे मारत आहेत. कधी सव्‍‌र्हर बंद असतो तर कधी त्याचा वेग मंदावलेला असतो.त्यामुळे कोणतेही काम वेळेत पूर्ण होत नाही. आरटीओचे अधिकारी सर्व कामे सुरळित असल्याचा दावा करतात. मात्र, कार्यालयामध्ये चित्र वेगळेच पहायला मिळते. रांगेत उभा राहण्याच्या कारणांवरुन वादा-वादीचे प्रसंगही घडत आहेत. त्यामुळे ऑनलाईन प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी आरटीओ कार्यालयाने उपायोजना कराव्यात, अशी मागणी वाहन मालकांकडून केली जात आहे.