प्रादेशिक परिवहन कार्यालयातील संगणकीय शुल्क पावत्यांचा साठा संपल्याने कामकाज जवळपास ठप्प झाले आहे. पावत्यांचा नवा साठा २३ सप्टेंबरनंतर उपलब्ध होणार असल्याने नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी शक्यतो त्यानंतरच कामकाजासाठी कार्यालयात यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.
वाहन नोंदणी, वाहन चालविण्याचा परवाना, वाहन मालकी हस्तांतरण, परवानाविषयक कामकाज, योग्यता प्रमाणपत्र, नोंदणी नूतनीकरण, वाहनावरील कर्ज बोजा चढविणे किंवा उतरविणे आदी कामांसाठी वापरण्यात येणाऱ्या संगणकीय शुल्क पावत्यांचा जुना साठा संपत आला आहे. त्यामुळे या कामकाजावर २० ते २३ सप्टेंबर या कालावधीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचे ‘आरटीओ’कडून कळविण्यात आले होते. त्यानुसार शुल्क पावत्यांचा साठा संपल्याने कामकाज जवळपास ठप्प झाले आहे.
पावत्यांचा नवा साठा २३ सप्टेंबरनंतर येणार आहे. तोवर नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २३ सप्टेंबरनंतरच संबंधित विविध कामांसाठी नागरिकांनी पुणे व आळंदी रस्ता येथील कार्यालयात यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.