20 November 2019

News Flash

आरटीओ ते टपाल कार्यालय.. परवान्यासाठी नागरिकांनाच हेलपाटे!

‘स्पीड पोस्ट’च्या कासव गतीमुळे हजारो परवाने वितरणाशिवाय पुण्याच्या मुख्य टपाल कार्यालयातच पडून आहेत.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात येणारे वाहन चालविण्याचे परवाने त्याचप्रमाणे वाहनांचे नोंदणी पुस्तके टपाल खात्यामार्फत ‘स्पीड पोस्ट’ने पाठविण्यात येत असताना सध्या ही सेवा पुरती विस्कळीत झाली आहे. ‘स्पीड पोस्ट’च्या कासव गतीमुळे हजारो परवाने वितरणाशिवाय पुण्याच्या मुख्य टपाल कार्यालयातच पडून आहेत. त्याचप्रमाणे विविध कारणांनी परत आलेले परवाने व कागदपत्र मिळविण्यासाठी टपाल व आरटीओकडूनही टोलवाटोलवी होत असल्याने आरटीओ ते टपाल कार्यालय, असे हेलपाटे मारावे लागत असल्याने नागरिक पुरते वैतागले आहेत.
वाहन चालविण्याचा परवाना व वाहनाचे नोंदणी पुस्तक टपालाच्या माध्यमातून नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचविण्याचा निर्णय राज्य शासनाने चार वर्षांपूर्वी घेतला होता. त्यानुसार सध्या ही कागदपत्रे केवळ टपाल कार्यालयाकडूनच नागरिकांना मिळतात. मात्र, मागील काही दिवसात पुण्यात वाहन परवाना घेणाऱ्यांची वाढलेली संख्या लक्षात घेता, टपालाची ही सेवा पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. नागरिकांना त्यांची कागदपत्रे घरपोच देण्याच्या योजनेतून टपाल खात्याला मोठय़ा प्रमाणावर उत्पन्न मिळत असले, तरी ही सेवा ढेपाळली आहे.
नियमानुसार नागरिकांना सात दिवसांच्या आत घरपोच परवाना व नोंदणी पुस्तक मिळणे गरजेचे आहे. मात्र, तीन ते चार महिने ही कागदपत्र मिळत नसल्याचा अनेकांचा अनुभव आहे. संबंधित व्यक्ती पोस्टमन घरी आल्याच्या वेळी उपलब्ध नाही, पत्ता सापडला नाही, अशा कारणांनीही परवाने परत टपाल खात्यात येतात. अनेक वेळेला पोस्टमनकडून हलगर्जीपणामुळे ही कागदपत्र नागरिकांपर्यंत पोहोचत नाहीत. या कारणांनीही नागरिकांना त्यांची कागदपत्र वेळेवर उपलब्ध होत नाहीत.
अनेक दिवस न मिळालेला परवाना किंवा नोंदणी पुस्तक मागण्यासाठी आरटीओकडे गेल्यास टपाल खात्याकडे चौकशी करा, असे सांगितले जाते. त्यानंतर संबंधित नागरिक आरटीओकडून परवाना काढताना देण्यात आलेली पावती घेऊन मुख्य टपाल कार्यालयात जातो. तेथे त्याला ‘बार कोड’ क्रमांक घेऊन येण्यासाठी पुन्हा आरटीओकडे पाठविले जाते. आरटीओकडे गेल्यास तेथेही ‘सरकारी काम जरा थांब’चा अनुभव नागरिकांना येतो. संबंधिताचे नाव शोधून त्याला ‘बार कोड’ क्रमांक देण्यास कोणीही उत्सुक नसते. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. आणखी धक्कादायक बाब म्हणजे तीन महिन्यांपेक्षा जास्त दिवस कागदपत्र टपाल कार्यालयात पडून राहिल्यास नागरिकांची ही कागदपत्र अक्षरश: गहाळ होतात. आता ते सापडत नाही, असे सांगून चक्क दुबार परवाना किंवा नोंदणी पुस्तक काढून घेण्याचा सल्ला दिला जातो.
पुणे शहर ऑटो रिक्षा फेडरेशनने याबाबत नुकतेच टपाल कार्यालयासमोर आंदोलन केले. त्यातून आता टपाल कार्यालयात मदत कक्ष उघडण्यात आला असला, तरी आरटीओ ते टपाल कार्यालयाचे हेलपाटे मात्र कमी होऊ शकलेले नाहीत. याबाबत संघटनेचे प्रदीप भालेराव म्हणाले, एक महिन्यापर्यंत पडून राहिलेली नागरिकांची कागदपत्रे तातडीने पुन्हा आरटीओकडे पाठविल्यास ते नागरिकांना उपलब्ध होऊ शकतात. कोणत्या महिन्यातील कागदपत्र परत आली आहेत, याचीही माहिती जाहीर झाल्यास ती टपाल  कार्यालयातून घेऊन जाणे सोयीचे होईल. त्याबाबत तातडीने व्यवस्था करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

First Published on January 8, 2016 3:33 am

Web Title: rto post office license speed post
टॅग License,Post Office,Rto
Just Now!
X