शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने राज्य शासनाने लागू केलेल्या नियमावलीनुसार नसणाऱ्या अनेक वाहनांतून शहरात विद्यार्थी वाहतूक केली जात असल्याने प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अशा वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. नियमबाह्य़ स्कूल बसबाबत २ आणि ३ नोव्हेंबरला केलेल्या कारवाईत आरटीओकडून सुमारे साडेतीनशे वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यातील ७५ वाहने दोषी आढळली असून, ५२ वाहने जप्त करण्यात आली आहेत.
स्कूल बसबाबत राज्य शासनाने लागू केलेल्या नियमावलीमध्ये विद्यार्थी वाहतुकीसाठी अत्यंत काटेकोर नियम करण्यात आले आहेत. नियमावलीनुसार संबंधितच स्कूल बस आहे की नाही, याची पडताळणी करण्यासाठी शालेय पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत समित्यांचे नियोजन आहे. मात्र, अद्यापही विद्यार्थी वाहतुकीतील सर्व वाहनांबाबत नियमावलीनुसार कार्यवाही केली जात नाही. मूळ वाहतुकीतून बाद झालेल्या आणि विद्यार्थी वाहतुकीचा कोणताही परवाना नसलेल्या वाहनांतून विद्यार्थ्यांची धोकादायक पद्धतीने वाहतूक करण्यात येते. या प्रकाराला आळा घालण्याच्या दृष्टीने आरटीओकडून वेळोवेळी कारवाईचे पाऊल उचलण्यात येते. त्या अंतर्गत दोन दिवसांच्या विशेष तपासणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
तपासणी मोहिमेसाठी पुणे शहर आणि उपनगरांतील सर्व महत्त्वाच्या रस्त्यांवर शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी एकूण सहा पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रत्येक पथकामध्ये तीन मोटार वाहन निरीक्षकांचा सहभाग होता. या पथकाने साडेतीनशे वाहनांची तपासणी केली. ७५ वाहने दोषी आढळले. या कारवाईमध्ये १ लाख २३ हजारांचा दंड आणि सुमारे साडेसहा हजारांचा कर वसूल करण्यात आला. जप्त करण्यात आलेली ५२ वाहने आरटीओ कार्यालय, पीएमपीचा स्वारगेट आणि कोथरूड डेपो येथे अटकाव करून ठेवली आहेत. अशा प्रकारची कारवाई यापुढेही सुरू ठेवण्यात येणार आहे. नियमावलीचे पालन न करणाऱ्या स्कूल बसबाबत परवाना निलंबन, नोंदणी क्रमांक रद्द आदी कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी दिला आहे.
आरटीओकडून शाळा, पालक, वाहतूकदारांना आवाहन
* पालकांनी आपल्या पाल्यांसाठी अधिकृत स्कूल बसचाच वापर करावा. खासगी वाहनांतून त्यांना शाळेत पाठवू नये.
* वाहनातून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक होणार नाही, याची वाहतूकदार आणि पालकांनी दक्षता घ्यावी. अन्यथा, संबंधित वाहनावर कडक कारवाई होईल. विद्यार्थ्यांच्या गैरसोईबद्दल पालक आणि वाहतूकदार जबाबदार राहतील.
* शाळा प्रशासनाने वाहतूकदाराशी आवश्यक ते परस्परसामंजस्य करार करावेत, ही बाब शाळांसाठी बंधनकारक आहे.
* शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्व परवानाधारक वाहतूकदारांनी स्कूल बस नियमावलीतील तरतुदींचे पालन करावे.
* विनापरवाना शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करू नये. वाहन मालकांनी स्कूल बस नियमावलीची पूर्तता करून त्वरित विद्यार्थी वाहतुकीचे परवाने घ्यावेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 4, 2017 2:57 am