कोणत्याही शर्यतीत अव्वल ठरणारा ‘तो’ याही शर्यतीत जणू जिंकण्यासाठीच धावत होता.. पण, निर्णायक क्षण जवळ येत असतानाच तो खाली कोसळला व शर्यतीत पुन्हा न धावण्याइतपत जखमी झाला.. शर्यतीत कोसळण्यापूर्वी कित्येक लाखांची किंमत असणाऱ्या त्याला आता काहीही किंमत राहिली नव्हती.. त्यामुळे त्याच्या वेदना व ठीक न होण्याच्या शक्यतेचा निष्कर्ष ‘काढून’ त्याची जीवनयात्राच संपविण्यात आली.. ही दुर्दैवी कथा आहे पुण्याच्या रेसकोर्सवर धावणाऱ्या ‘कॉन्टिनेन्टल’ नावाच्या एका घोडय़ाची..!
पुणे रेसकोर्सवर रविवारी दुपारी नानोली स्टड फार्मची प्रथम क्षेणीची घोडय़ांची शर्यत आयोजित करण्यात आली होती या शर्यतीमध्ये दहा घोडय़ांचा समावेश होता. त्यात कॉन्टिनेन्टल या घोडय़ाचाही समावेश होता. त्याच्याबरोबरीने त्याचा तगडा स्पर्धक बुलरन नावाचा घोडाही होता. कॉन्टिनेन्टल हा काही साधासुधा नव्हे, तर कोणत्याही शर्यतीतजिंकण्याची क्षमता असणारा घोडा होता. त्याने नुकत्याच झालेल्या दोन शर्यतींमध्ये पहिला क्रमांक मिळविला होता. त्यामुळे या स्पर्धेतही तोजिंकण्याची आशा होती.
दोन हजार मीटर धावण्याच्या या शर्यतीमध्ये कॉन्टिनेन्टल इतर स्पर्धकांच्या बरोबरीने धावत होता. मात्र,अचानक एका बाजूने त्याला बुलरन या घोडय़ाची धडक बसली. ही धडक बसताना कॉन्टिनेन्टल अत्यंत वेगात असल्याने त्याच्यासह त्याचा जॉकी सूरज नऱ्हेडू हाही कोसळला. त्यानंतर जॉकी उठून बसला, मात्र कॉन्टिनेन्टलला उठता आले नाही. त्यामुळे तातडीने वैद्यकीय पथक मैदानात दाखल झाले. त्यांनी जॉकीला रुग्णालयात दाखल केले. वेगात खाली कोसळल्यामुळे कॉन्टिनेन्टलच्या पायाची हाडे तुटली होती. आता स्पर्धेसाठी त्याचा काहीही उपयोग नव्हता. लाखोंची किंमत व कोटय़वधीचा खेळ करणारा हा घोडा संयोजकांसाठी कुचकामी झाला होता. त्यामुळे शस्त्रक्रिया करूनही तो ठीक होणार नसल्याचा निष्कर्ष काढून अखेर त्याची जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेण्यात आला व तातडीने त्याची अंमलबजावणीही करण्यात आली!