चालकाचे प्रसंगावधानामुळे प्रवासी सुखरुप, बघ्यांची गर्दी; चित्रीकरणासाठी चढाओढ

पीएमपीच्या बसला भर रस्त्यात आग लागण्याच्या घटना काही केल्या थांबण्याची चिन्हे दिसेनात. सोमवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास पिंपरीत पीएमपीच्या धावत्या बसला आग लागली. सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील प्रवाशांचे प्राण वाचले. आगीची घटना पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली. मात्र, आग विझवण्यासाठी काही प्रयत्न करण्याऐवजी मोबाइलमध्ये चित्रीकरण करण्यासाठी नागरिकांमध्ये चढाओढ दिसून आली.

प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी पालिका मुख्यालयासमोर दुपारी पावणेचारच्या सुमारास पिंपरी ते भोसरी ही पीएमपी बस महापालिका मुख्यालयासमोरून जात होती. त्या वेळी बसमध्ये १५ ते २० प्रवासी होते. आधी बसमधून धूर येत होता, थोडय़ाच वेळात बसने अचानक पेट घेतला.

बसला आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली. चालक दीपक भरणे आणि वाहक मूलचंद यादव यांनी प्रसंगावधान राखून बस थांबवली आणि प्रवाशांना खाली उतरवले. त्यामुळे पुढील प्रकार टळला. मात्र, आगीत बसचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. या प्रकाराची माहिती अग्निशामक दलाला कळवण्यात आली. थोडय़ाच वेळात त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

बस पेटलेल्या अवस्थेत असताना आग विझवण्याऐवजी बहुतांश नागरिक मोबाइलमध्ये चित्रीकरण करण्यात दंग होते.यापूर्वी, रस्त्यावरील धावत्या बसने पेट घेण्याचे अनेक प्रकार पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात झाले आहेत. मात्र, अद्यापही अशा घटनांकडे पीएमपी प्रशासनाकडून फारसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे दिसून येते.