उस्मानाबाद येथून मुंबईला ट्रकमधून जाणारे ७२ लाख रुपयांचे २३ टन गोमांस शिरगाव आणि तळेगाव पोलिसांनी पकडले आहे. याप्रकरणी वाहनचालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिवशंकर राजेंद्र स्वामी यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागनाथ चनप्पा नागेशी (वय ३८), अन्वर शब्बीर शेख (वय २४), राहुल सुरेश बेळे (वय २६) अशी टेम्पो चालकांची नावे असून यांच्यासह क्लिनरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिवशंकर स्वामी यांना उस्मानाबाद येथून गोमांस आणि बैलाचे मांस चार टेम्पोमधून घेऊन जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती.

दरम्यान, संशय येऊ नये म्हणून मांसाच्या वर भाजीपाला असलेले कॅरेट ठेवण्यात आले होते. फिर्यादी स्वामी हे त्यांच्या संपर्कातील पिंपरी, तळेगाव येथील सहकाऱ्यांना सोबत घेऊन पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पहाटेच्या सुमारास थांबले आणि त्यांनी पोलिसांच्या मदतीने सापळा रचून शिरगावात तीन तर तळेगावच्या हद्दीत एक असे एकूण चार टेम्पो पकडले.

त्यानंतर तातडीने पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रुपाली दडके यांच्यासमोर पंचनामा करून पुढील कारवाई करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे आणि वाघमोडे यांनी दिली.