सर्वाधिक मतदान ७५.९२ टक्के इंदापुरात

पुणे जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातील दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये सरासरी ६५.२४ टक्के मतदान झाले. त्यामध्ये सर्वाधिक मतदान ७५.९२ टक्के इंदापूर मतदारसंघात, तर सर्वात कमी ६२.९३ टक्के भोर मतदारसंघात झाले. सन २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत ग्रामीण भागात सरासरी ७१.९८ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे या निवडणुकीत ६.७४ टक्के एवढे मतदान घटल्याचे स्पष्ट झाले आहे.

ग्रामीण भागातील दहा मतदारसंघांतील मतदारांची संख्या २९ लाख ५३ हजार ३१४ आहे. त्यापैकी २२ लाख ५९ हजार ६९६ मतदारांनी मतदान केले. गेल्या विधानसभा निवडणुकीत ग्रामीण भागातील दहा मतदारसंघांमध्ये सर्वाधिक ७८.७७ टक्के मतदान इंदापुरातच झाले होते. या मतदारसंघात दोन लाख १८ हजार १३२ मतदारांनी मतदान केले होते, तर सर्वात कमी ६८.७१ टक्के मतदान भोरमध्येच झाले होते. या मतदारसंघात दोन लाख १८ हजार ६०२ मतदारांनी मतदान केले होते. सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भोर आणि शिरूर वगळता सर्व मतदारसंघात ७० टक्क्य़ांपेक्षा जास्त मतदान झाले होते. दरम्यान, यंदा इंदापूर पाठोपाठ मावळात ७१.१६ टक्के मतदान झाले आहे. उर्वरित सर्व मतदारसंघात ६० टक्क्य़ांपेक्षा जास्त मतदान झाले आहे.

पुरुषांचे मतदान सरासरी ७०.७८ टक्के

ग्रामीण भागात १७ लाख ३० हजार ४९८ पुरुष मतदारांपैकी १२ लाख २२ हजार ७६२ जणांनी मतदान केले. त्याची टक्केवारी ७०.७८ आहे.  १५ लाख ९१ हजार ५३६ महिला मतदारांपैकी दहा लाख ३६ हजार ९२९ महिलांनी मतदान केले. त्याची टक्केवारी ६५.२४ आहे, तर ५४ तृतीयपंथी मतदारांपैकी केवळ पाच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान (टक्केवारी)

  जुन्नर            : दोन लाख एक हजार ७६४ (६७.३३)

 आंबेगाव        : एक लाख ८९ हजार ३२१ (६६.७७)

 खेड आळंदी    : दोन लाख २० हजार १६५ (६७.२७)

  शिरूर            : दोन लाख ५८ हजार १३ (६७.२१)

 दौंड               :      दोन लाख १२ हजार (६८.७१)

   इंदापूर            : दोन लाख ३२ हजार ५ (७५.९२)

   बारामती         : दोन लाख ३३ हजार ६२१ (६८.३८)

 पुरंदर             : दोन लाख ३६ हजार ९७५ (६५.५६)

    भोर              : दोन लाख २७ हजार ४५६ (६२.९३)

  मावळ            : दोन लाख ४७ हजार ९६१ (७१.१६)

एकूण २२ लाख ५९ हजार ६९६ मतदारांचे मतदान

एकूण टक्केवारी ६५.२४