पुण्यात टाळेबंदी उठवण्याबाबत मुख्यमंत्री उत्सुक नव्हते. मात्र, व्यापारी वर्ग आणि कर्मचाऱ्यांच्या संघटना अशा विविध घटकांकडून टाळेबंदी उठवण्याची मागणी होत होती. त्यामुळे टाळेबंदी उठवण्यात घाई झाली, अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली.

पुणे शहर हे देशातील करोना संसर्गाचा हॉटस्पॉट बनले आहे. याबाबत मुंबई आणि दिल्ली या महानगरांनाही पुण्याने मागे टाकले असून दररोज सुमारे दीड हजार नागरिकांना करोनाची बाधा होत असल्याचे समोर येत आहे. त्याचबरोबर मृतांचा आकडाही सरासरी चाळीशी गाठत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात शनिवारी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीनंतर झालेल्या पत्रकर परिषदेत त्यांनी पुण्यातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यात टाळेबंदी उठवण्याबाबत घाई झाल्याची कबुली दिली. व्यापारी वर्ग आणि कर्मचारी संघटनांच्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काहीना मास्कची गरज वाटत नाही

करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, अनेक ठिकाणी नागरिक मास्क वापरताना दिसत नाही. फिजिकल डिस्टंन्स पळताना दिसत नाही. तर काहींना वाटते की, मास्कची गरज नाही, असे निरिक्षण नोंदवताना प्रत्येकाने मास्कचा वापर करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. तसेच मास्क न घालणाऱ्या आणि कुठेही थुंकणार्‍यावर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्यातील करोनाबाधितांची संख्या पोहोचली १,०३,८१२ वर

दरम्यान, पुणे शहरात शनिवारी दिवसभरात नव्याने १७३६ रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या १ लाख ३ हजार ८१२ एवढी झाली आहे. तर आज दिवसभरात ३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर २ हजार ४६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या १,४५६ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ८५ हजार ३७१ रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.