ठेकेदारांकडून भाडेतत्त्वावर बस घेण्याऐवजी राज्य परिवहन महामंडळाने स्वत:च शिवनेरी बसची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुणे विभागाच्या ताफ्यामध्ये महामंडळाने खरेदी केलेल्या नऊ शिवनेरी बसचा नुकताच समावेश झाला आहे.
एसटीने भाडेतत्त्वावर ४० शिवनेरी बस घेतल्या होत्या. त्यापैकी नऊ बसचा करार संपला होता. त्यामुळे या बसची कमतरता जाणवत होती. त्यामुळे एसटीने १२ शिवनेरी बसची खरेदी केली. त्यापैकी नऊ बस पुणे, तर तीन बस मुंबई विभागासाठी मंजूर करून त्या बस प्रवाशांच्या सेवेत रूजू करण्यात आल्या. त्यामुळे एसटीच्या १२, तर भाडेतत्त्वावरील ३१ बस सध्या कार्यरत आहेत.
सध्या उन्हाळी सुटीमुळे प्रवाशांची संख्या वाढली आहे. बहुतांश प्रवासी शिवनेरीच्या प्रवासाला प्राधान्य देतात. त्यामुळे शिवनेरी बसची मोठी कमतरता जाणवत होती. नव्या शिवनेरी बस ताफ्यामध्ये दाखल झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे. एसटीच्या ताफ्यातील बहुतांश बस खासगी ठेकेदारांच्या असल्याने एसटीला त्यातून फारसे उत्पन्न मिळत नसल्याचे चित्र होते. त्यामुळेच आता ठेकेदाराचा करार संपल्यानंतर संबंधित बसच्या जागी स्वत:ची बस घेण्याचा निर्णय एसटीने घेतला आहे. प्रत्येक बससाठी ठेकेदाराचा करार पाच वर्षांचा असतो. टप्प्याटप्प्याने बसचे करार संपतील, त्यानुसार नव्या बस एसटीच्या ताफ्यात दाखल होतील. १२ बसच्या खरेदीतून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
नव्या शिवनेरी बस बंगळुरू येथून खरेदी करण्यात आल्या आहेत. बसच्या पाहणीसाठी काही दिवसांपूर्वी पुण्यातून पथक गेले होते. बसचा रंग, आसन व्यवस्था, सस्पेन्शन आदी तांत्रिक गोष्टींची तपासणी केल्यानंतरच बसची खरेदी करण्यात आली.