राज्यभरातील एसटीच्या कर्मचाऱ्यांना २५ टक्के वेतनवाढ देण्याची मागणी करीत महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसने (इंटक) १७ डिसेंबरला राज्यव्यापी संप जाहीर केला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या प्रश्नावर संघटनेने गुरुवारी राज्यव्यापी मेळावा घेतला. या मेळाव्यात संपाची घोषणा करण्यात आली. इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसचे (इंटक) राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जी. संजीवा रेड्डी, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड, सचिन साठे, कामगार नेते राजन नायर, उपाध्यक्ष बंडोपंत वाडकर, कार्याध्यक्ष मुकेश तिगोटे आदी त्या वेळी उपस्थित होते.
डॉ. रेड्डी म्हणाले,‘इतर राज्यांमध्ये परिवहन महामंडळ व राज्यातील एसटीचे कर्मचारी एकाच प्रकारचे काम करतात. इतर राज्यात चांगले वेतन असताना राज्यातील एसटी कामगारांना मात्र तुटपुंजे वेतन दिले जाते. सरकारला एसटीच्या कामगारांचे प्रश्न व समस्या दिसत नाहीच. त्यामुळे या प्रश्नावर आता संप केल्याशिवाय पर्याय नाही. त्याशिवाय सरकार निर्णय घेणार नाही.’
छाजेड म्हणाले, १९९५ नंतर एसटीच्या कर्मचाऱ्यांना अपेक्षित वेतनवाढ झाली नाही. एसटीच्या मान्यताप्राप्त संघटनेने काहीच काम केले नसल्याची टीकाही त्यांनी केली.