तामीळनाडूत उत्पादन कमी झाल्याने दर तेजीत

व्रतवैकल्यांचा महिना असलेल्या श्रावण महिन्यात साबुदाण्याचे दर तेजीत गेले आहेत. संपूर्ण देशाचा विचार करता साबुदाण्याचे उत्पादन तामीळनाडूतील सेलम जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणावर घेतले जाते. यंदा साबुदाण्याचे उत्पादन कमी झाल्याने गेल्या दोन ते तीन महिन्यांत साबुदाण्याचे दर प्रति किलोमागे दहा रुपयांनी वाढले आहेत.

साबुदाण्याचे नवीन उत्पादन येण्यास आणखी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने साबुदाण्याचे दर तेजीत राहणार आहेत. साबुदाण्याला सर्वाधिक मागणी श्रावण महिना, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात असते. संपूर्ण देशात साबुदाण्याचे उत्पादन फक्त तामीळनाडूत घेतले जाते. तामीळनाडूतील सेलम जिल्ह्य़ात साबुदाण्याचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर घेतले जाते. गेल्या हंगामात साबुदाण्याचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे साबुदाण्याची आवक कमी झाली आहे. आवक कमी झाल्याने साबुदाण्याच्या दरात प्रति किलोमागे दहा रुपयांनी वाढ झाली असल्याचे मार्केट यार्डातील भुसार बाजारातील साबुदाणा विक्रेते अनिल नहार यांनी सांगितले.

श्रावण महिना, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात साबुदाण्याच्या मागणीत वाढ होते. अनेक जण उपवास करतात. त्यामुळे नेहमीच्या तुलनेत साबुदाण्याला चांगली मागणी असते. सध्या बाजारात दररोज तीन ते चार ट्रक साबुदाण्याची आवक होते. साधारणपणे एका ट्रकमध्ये सोळा टन साबुदाणा असतो. सोमवारी साबुदाण्याची आवक वाढून बाजारात ५ ते ७ ट्रकपर्यंत माल विक्रीसाठी पाठविला जातो, असे नहार यांनी सांगितले.

सेलममध्ये साबुदाण्याचे मोठे उत्पादन

साबुदाण्याचे सर्वाधिक उत्पादन तामीळनाडूतील सेलम जिल्ह्य़ात होते.  तेथील कंपन्यात साबुदाण्यावर प्रक्रिया करून देशभरात पाठविला जातो. साबुदाण्याचे नवीन उत्पादन येण्यास आणखी दोन ते तीन महिने लागणार आहे. नोव्हेंबरनंतर नवीन साबुदाण्याची आवक सुरू होईल. जानेवारी महिन्यात साबुदाण्याची आवक वाढेल. तेव्हा साबुदाण्याचे दर कमी होतील, असे घाऊक बाजारातील साबुदाणा विक्रेते अनिल नहार यांनी सांगितले.

साबुदाण्याचे घाऊक बाजारातील दर

  • साबुदाणा (प्रतवारीनुसार) – ४५०० ते ५३०० रुपये (शंभर किलो)
  • घाऊक बाजारातील प्रतिकिलोचा दर- ४५ ते ५३ रुपये
  • किरकोळ बाजारातील दर- ५२ ते ७० रुपये