सचिन असं कधीच करू शकणार नाही. आम्ही नरेंद्र दाभोलकरांना ओळखतही नाही. इतकंच काय तो आणि मी कधीही पुण्याला आलो नाही. पोलीस विनाकारण सचिनला या प्रकरणात अडकवत असल्याचा गंभीर आरोप डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात अटक करण्यात आलेल्या सचिन अंदुरे याचा भाऊ प्रवीण यांनी केला आहे. रविवारी पुणे जिल्हा सत्र न्यायालयाबाहेर प्रसारमाध्यमाशी बोलताना त्यांनी हा आरोप केला.

प्रवीण अंदुरे म्हणाले की, तो आणि मी कधीही पुण्याला आलेलो नाही. आमच्या कुटूंबातील कोणताही व्यक्ती नरेंद्र दाभोलकराना ओळखत नाही. ज्यावेळी सचिनला पोलिसांनी दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी ताब्यात घेतले. तेव्हा काहीच माहिती आम्हाला दिली नाही. पोलीस यंत्रणेवर दबाव असल्याने त्याला अडकवण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

सचिन असं कधीच करू शकत नाही. त्याने एम.कॉम केले आहे. तो एका कपड्याच्या दुकानात अकाऊंट विभागात काम करत होता. त्याचे दीड वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. त्याला सहा महिन्यांचा मुलगा असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व प्रकारामुळे घरातील वातावरण बदलले असून लवकरच सर्व सत्य समोर येईल, असे ते म्हणाले.

दरम्यान, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला अटक करण्यात आल्यानंतर आज प्रथम न्यायदंडाधिकारी ए. मुजुमदार यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी सचिनला २६ ऑगस्टपर्यँत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली. तत्पूर्वी न्यायालयामध्ये सीबीआयचे वकील विजयकुमार ढाकणे यांनी हत्येवेळी आरोपीने कुठून पिस्तुल मिळवले आणि ते चलवण्यासाठी प्रशिक्षण कोठे घेतले. या तपासासाठी १४ दिवसांची सीबीआय कोठडीची मागणी केली. तर बचाव पक्षाचे वकील प्रकाश सलसिंगीकर यांनी वीरेंद्र तावडेच्या आरोपपत्रामधील नोंदीनुसार सचिन अकोलकर आणि विनय पवार यांचा खुनाशी संबंध असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सचिन अंदुरे विरोधात कोणताही पुरावा नसताना त्याला अटक करण्यात आल्याचा दावा केला. सलसिंगीकर यांचा दावा सीबीआयचे वकील विजयकुमार ढाकणे यांनी खोडून काढला. या दोन्ही बाजू ऐकून घेतल्यावर सचिन अंदुरे याला २६ ऑगस्टपर्यँत सीबीआय कोठडी सुनावली.