पु.ल. देशपांडे हे एक अफाट व्यक्तिमत्त्व होते. सामान्य माणसाशी त्यांना सहज जोडून घेता येई असं म्हणत मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या घरी येऊन मी गहिवरलो असल्याचेही सचिनने म्हटले आहे. मी पुलंच्या जेवढ्या सीडीज पाहिल्या त्यातून हे जाणवले की पु.ल. देशपांडे सामान्य माणसाशी अगदी सहज जोडले जायचे. मी सर डॉन ब्रॅडमन यांच्या वाढदिवसाला त्यांच्या घरी गेलो होतो. त्यावेळी जेवढा आनंद झाला तेवढाच आनंद मला पुलंच्या घरी येऊन झाला अशा भावना सचिन तेंडुलकरने व्यक्त केल्या. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज पुलंच्या पुणे येथील भांडाकर रोडवर असलेल्या घराला भेट दिली. त्यानंतर त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.

 

सचिन तेंडुलकरने यावेळी पुलंच्या कुटुंबातील काही व्यक्तींशी संवाद साधला. पु. ल. देशपांडे यांचे हे जन्म शताब्दी वर्ष आहे. याच निमित्ताने सचिनच्या हस्ते आय लव्ह पुलं (मी पुलं प्रेमी) या कार्यक्रमाच्या लोगोचे आणि पुलोत्सव पुणेच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.
यावेळी सचिन तेंडुलकरने जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. माझे बाबा आणि पु ल देशपांडे चांगले मित्र होते. त्यांची अनेक पत्रं बाबांनी मला दाखवली आहेत. माझे भाऊ आई वडील सतत पुलंविषयी बोलत असत. माझे बाबा आणि पुलं खूप चांगले मित्र होते. त्यांना मी १९९६ मध्ये भेटलो होतो. तेव्हा मी त्यांच्या सोबत फिश फ्राय खाल्ले होते. तेव्हा त्यांना फ्रेम दिली होती. ती फ्रेम आता पुन्हा परत पाहायला मिळाली असल्याचेही सचिनने सांगितले.