पुण्यातल्या गणेशोत्सवाची परंपरा लोकमान्य टिळकांपासून चालत आलेली आहे. पुण्यातला गणेशोत्सव, मानाचे पाच गणपती, शिस्तबद्ध मिरवणुका, तालबद्ध संचलन सगळे काही अनुभवण्यासारखे असते. याच खास परंपरा असलेल्या गणेशोत्सवाला १२५ वर्षे पूर्ण होत आहेत याच निमित्ताने, क्रिकेटचा देव सचिन या उत्सवाचा ब्रँड अँबेसेडर होण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेत यासंदर्भात एक बैठक पार पडली त्यानंतर महापौर मुक्ता टिळक यांनी सचिन तेंडुलकरला गणेश उत्सवाचा विशेष दूत म्हणून नेमण्यावर चर्चा झाल्याची माहिती दिली आहे.

पुणे महापालिकेत गणेश उत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त आज महापौर मुक्ता टिळक यांच्या अध्यक्षतेखाली सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, शिवसेना गट नेते संजय भोसले यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.

यावेळी महापौर टिळक म्हणाल्या की,नेहमी प्रमाणे यंदा देखील गणेश उत्सव उत्साहात पार पडणार असून त्या दृष्टीने प्रशासना मार्फत विशेष नियोजन करण्यात येत आहे. या गणेशोत्सवासाठी महापालिका 2 कोटी रुपये खर्च करणार असून 25 ऑगस्टला गणेशोत्सव सुरु होणार आहे.मात्र त्यापूर्वी महिनाभर अगोदर शहरातील विविध भागात कार्यक्रम घेतले जाणार आहेत. हे कार्यक्रम येत्या 11 जुलैला घेण्यात येणाऱ्या पुढील बैठकीत निश्चित केले जाणार आहेत. गणेशोत्सवासाठी विशेष बोधचिन्ह तयार करण्यात येणार आहे.

सचिन तेंडुलकरची क्रिकेटमधली भरारी आपण सगळ्यांनीच पाहिली आहे. तो एक स्टार क्रिकेटर राहिला आहे. क्रिकेटचा देव अशीच त्याची ख्याती जगभरात आहे. तो मैदानावर आला की सगळ्यांच्या नजरा त्याच्या खेळाकडे असायच्या. सचिनचे चाहते जगभरात आहेत. याच गोष्टीचा आधार घेत पुण्यातल्या गणेशोत्सवाचा प्रसार जर सचिनने केला तर ती पुणेकरांसाठी पर्वणीच ठरणार आहे. आज झालेल्या बैठकीत यावर चर्चा झालीये सचिन तेंडुलकर ब्रँड अँबेसेडर होणार की नाही हे मात्र त्याच्या होकारावर अवलंबून आहे.