गाण्याची कुंडली तेच गाणे लिहीत असते, त्यामुळे त्याला कोणत्या ज्योतिषाची गरज नसते. त्यासाठी केवळ गाण्याबाबत संगीतकाराला आत्मविश्वास हवा, असे विचार ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केले.
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पं. मंगेशकर यांना सचिनदेव बर्मन पुरस्काराने गौरविण्यात आले. त्या निमित्ताने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पं. मंगेशकर म्हणाले की, माझ्यात जे आहे ते अनुवंशिक आहे. वडील व आईकडून मिळालेली ती देणगी आहे. ठरवून काही नवे प्रयोग करण्यात अर्थ नसतो, तर ते सुचावेत लागते. मला जी कलाकृती स्वत:ला आवडली तीच आजवर करत गेलो. त्यामुळे व्यावसायीकांबरोबर माझे फारसे पटले नाही. माझ्या गितांच्या चाली अवघड आहेत, असे बोलले जाते. पण, गायकाची गाण्याची इच्छा हवी. गाण्यातून ते गाणे निघते का, हे पाहिले पाहिजे. ज्याला त्याकडे वळायचे नसते, ते चाली अवघड आहेत, असे म्हणतात.
ठरवून काही केले, तर गाणे वाईट होते, असे सांगून ते म्हणाले की, तडजोड करून गाणी केली, तर ती चांगली होत नाहीत. त्यामुळे मी गाण्यात तडजोड केली नाही. आजच्या काळातील संगीतकारांना कविता व गाण्याची माझ्यापेक्षा अधिक जाण असेल, पण निर्माते ऐकत नसतील म्हणून त्यांना ‘कोंबडी’, ‘रिक्षावाला’ सारखी गाणी आणावी लागत असतील. पण, मी अशी तडजोड केली नाही. माझ्या कालावधीत मी काम केले, पण आजही काहीतरी करायचे राहून गेले, असे मलाही वाटते. खूप चाली स्वत:ला आवडतात. त्या निर्माता किंवा दिग्दर्शकाला ऐकवित नाही. कुणाला न ऐकविलेल्या अजूनही अनेक चाली आहेत.
गाण्यांच्या ‘रियालिटी शो’बाबत ते म्हणाले की, या कार्यक्रमांचा माझा अनुभव वाईट आहे. कोण पहिला व दुसरा हे आधीच ठरलेले असते. जाहिराती मिळविणे व ‘एसएमएस’चा पैसा मिळविण्यासाठी सर्वकाही असते. लहान मुलांच्या जीवाशी ते खेळतात. कार्यक्रमातून बाहेर पडले की या मुलांना लोक कुठे ठेवतात, हे माहीत नाही. पहिला आलेल्याचे काही काळ कौतुक होते. नंतर त्याचे नावही माहिती होत नाही.