शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात सरकारला जागे करण्यासाठी सुरु झालेल्या आत्मक्लेश यात्रेत खासदार राजू शेट्टी यांनी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरत आहे. यापार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी शेतकरी संघटनेसाठी सदाभाऊ खोत हा विषय संपल्याचे सांगितले. शेट्टी आणि खोत यांच्यातील मतभेद टोकाला गेल्याचे सध्या दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून शेट्टी आणि खोत यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आत्मक्लेश यात्रेत ते शेट्टी यांना साथ देणार का? याची चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले.

त्यामुळेच आत्मक्लेश यात्रेच्या पहिल्याच दिवशी शेट्टींना खोत यांच्या अनुपस्थितीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. खोत यांच्या अनुपस्थितीबाबत पहिल्या दिवशी मौन बाळगल्यानंतर मंगळवारी शेट्टी यांनी खोत यांना चांगलाच टोमणा लगावला. शेट्टी म्हणाले की, सदाभाऊ खोत हा विषय संपलेला असून, आता पुन्हा मला यावर बोलायला लावू नका. यापुढे फक्त शेतकऱ्यांबद्दल विचारा.

पिंपरी चिंचवडमधून मंगळवारी सकाळी आत्मक्लेश यात्रा देहूरोडच्या दिशेने मार्गस्थ झाली. आत्मक्लेश यात्रेचा पुढील मुक्काम वडगावमधील पूजा हॉटेलला आहे. यापूर्वी अमरजाई मंदिर येथे दुपारच जेवण करुन पुढील १० किलोमीटरच्या प्रवासाला ४ वाजण्याच्या सुमारास सुरुवात होणार आहे. पिंपरी चिंचवडमधून आत्मक्लेश यात्रेला शिवसेनाकडून पाठिंबा दर्शविण्यात आला असून आत्मक्लेश यात्रेला शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि इतर शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

[jwplayer QeX24EUp]