News Flash

बाजारभेट : आरोग्यदायी सदाशिव पेठ!

कालांतराने आता या परिसराची ओळखदेखील हळूहळू बदलत गेली.

पुण्याची सदाशिव पेठ ही अनेकांच्या दृष्टीने कायम चर्चेचा विषय राहिली आहे. चौसोपी अंगणाचे वाडे, मध्यमवर्गीयांच्या चाळी, विद्वानांच्या दिमाखदार वास्तू, भारलेली शिक्षण संकुले, पेशवेकालीन मंदिरे, वाडय़ातील प्राजक्ताची झाडे, सायकलींची वर्दळ आणि संस्कारांचा ठेवा जपणारी पेठ. असा या परिसराचा लौकिक होता. कालांतराने आता या परिसराची ओळखदेखील हळूहळू बदलत गेली. पांढरपेशांबरोबरच, अनेक व्यापारी, उद्योजक, परप्रांतीय मंडळींनी वाडे पाडून उभ्या राहिलेल्या संकुलांमध्ये वस्ती केली. पुण्याबाहेरील हजारो विद्यार्थी याच परिसरात एकत्र राहू लागले. तरुणाईच्या गरजा ओळखून, नवनवे व्यवसाय सुरू झाले; महत्त्वाच्या रस्त्यांना लगेचच जोडणारी पेठ, शांतता आणि सौहार्दाची परंपरा लक्षात घेऊन. अनेक धनिकांनी, व्यवसाय आणि निवासाची माफक दरातील सोय लक्षात घेऊन, याच परिसरात बस्तान बसवले आणि येथील बहुसंख्य पूर्वीची मंडळी, कोथरूड, सिंहगड परिसरात स्थलांतरित झाली. परिवर्तनाच्या या धिम्या प्रक्रियेतून सदाशिव पेठेत आता उभी राहिली आहे आरोग्याची बाजारपेठ! सुमारे दीड किलोमीटर चौरस परिसरात येथील दुकानांमध्ये, जागतिक कोणत्याही कंपनीचे औषध, साहित्य, तासा दोन तासांत उपलब्ध होते अशी माहिती मिळाली.

सदाशिव पेठेच्या नेमक्या भागाचा उल्लेख केल्यास ज्ञानप्रबोधिनी ते शनिपार चौक, बाजीराव रस्ता, या टापूत कुमठेकर रस्त्याला समांतर अशा चार प्रमुख रस्ते आणि जोड भागात सध्या आरोग्य सेवेशी संबंधित अशी तीनशेहून अधिक दुकाने आहेत. छोटय़ा-मोठय़ा व्यवसायांचा विचार करता प्रत्यक्ष दुकानाशी संबंधित असे दोन अडीच हजार कर्मचारी आणि त्यांचे परिवार या व्यवसायाशी निगडित आहेत. पुणे शहर, उपनगरे आणि जिल्ह्य़ामध्ये एकूण तीन हजारांहून अधिक जण हा पूर्ण वेळचा व्यवसाय करतात. व्यवसायाचे वर्गीकरण केल्यास १) सर्जिकल. २) जेनेरिक. ३) इथिकल, ४) आयुर्वेदिक, ५) होमिओपथिक, ६) व्हेटरनरी (पशू- पक्षी औषधे) ७) कॉस्मेटिक्स असे मुख्य विभाग आहेत. सदाशिव पेठेतच हा व्यवसाय केंद्रित होण्याची कारणे शोधताना समजले, की लक्ष्मी रस्ता, शनिपार चौक आणि कॅम्प परिसरात पूर्वापार औषध/साहित्य विक्रीचा व्यवसाय करणारी मोजकी आणि विखुरलेली मंडळी होती. हिरालाल मेहता, नितीन एजन्सी, मेडिको डिस्ट्रिब्युटर्स, सिद्धी सर्जिकल्स, कपिला पशू-पक्षी औषधालय अशी काही नावे वानगीदाखल सांगितली गेली. ग्राहकांची एकत्रित खरेदीची सोय, पार्किंग सुविधा, मध्यवर्ती स्थान आणि तुलनात्मकदृष्टया व्यावसायिक आणि निवासी जागांचे माफक दर यामुळे शहराच्या या सुसंस्कृत, शांत लोकवस्तीच्या भागात औषध आणि आरोग्य साहित्याच्या विक्रीची बाजारपेठ साधारणपणे १९९४ नंतर केंद्रित होऊ लागली. श्रीराम एन्टरप्राइजेस, कुंदन आणि तापडिया डिस्ट्रिब्यूटर्स या काही बडय़ा व्यावसायिकांचा उल्लेख इथे अपरिहार्य ठरेल. औषध आणि पूरक साहित्य विक्रेत्यांची, केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट ही संघटना असून, शहर आणि जिल्ह्य़ात त्यांचे सात हजारांहून अधिक सभासद आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाचे या विभागावर नियंत्रण आहे. नवे कायदे आणि सुविधांची जाण करून देणे तसेच परस्पर सुसंवादासाठी, वर्षभरात किमान सात-आठ वेळा सभासदांचे एकत्रीकरण होते. आपद्ग्रस्तांसाठी तसेच प्रतिवर्षी वारकरी मंडळींसाठी बिनबोभाट आरोग्य सेवा हे संघटनेचे वैशिष्टय़ आहे. व्यवसायातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची सुयोग्य विल्हेवाट करण्याचे तंत्र संघटनेने अंगीकारले आहे. नागरी वस्तीतील व्यवसाय असल्याने संघटनेने परस्पर सौहार्दाचे वातावरण जोपासण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे. अत्याधुनिक संगणक यंत्रणा अमलात आणून मागणी, पुरवठा, तुटवडा, साठा परिस्थिती यामध्ये समन्वय साधला जातो. अप्रत्यक्षरीत्या या प्रक्रियेने व्यवहारात पारदर्शकता साधली गेल्याचे सांगण्यात आले. डिलिव्हरी बॉईजचे कार्य या व्यवसायात, शरीरातील रक्तवाहिन्यांप्रमाणे आहे. किरकोळ विक्रेत्याची मागणी, घाऊक दुकानदारांकडे पोचवणे, त्याप्रमाणे पुरवठा उपलब्ध करणे ही सर्व कामे २०० पेक्षा अधिक तरुण ज्यांना डिलिव्हरी बॉईज संबोधतात ते करतात. मुख्यत्वे सायकल वा दुचाकीला पिशव्या बांधून, त्यातून हा पुरवठा केला जातो. या सेवेद्वारे, महिना पंधरा ते वीस हजार रुपयांची कमाई होते. व्यवसायात घाऊक विक्रेत्यांचे कमिशन ८ ते १० टक्के, तर किरकोळ विक्रेत्यांचे १६ ते २० टक्के कमिशन असते असे समजले. फुरसुंगी आणि वाघोली परिसरात औषध कंपन्यांची गोडावून आहेत. मुदतबाह्य़ औषध परत घेण्याबाबतचे काही संकेत हे सुद्धा परस्पर सामंजस्यातून ठरवून घेतले आहेत.

विक्रेत्यांशी चर्चेतून काही उपयुक्त, वेगळी आणि नवी माहिती मिळाली. मधुमेह आणि रक्तदाब तसेच हृदयविकारावरील औषधांना सर्वाधिक मागणी आहे. बदलत्या जीवनशैलीचे दुष्परिणाम समजूनही फारसा अनुकूल प्रतिसाद लाभत नाही असे निरीक्षण आहे. वाढत्या लोकसंख्येत, घरटी एक माणूस कोणत्या तरी औषधावर अवलंबून असतो. यामध्ये ज्येष्ठांचे बरोबरीने मध्यमवयीन मंडळींचे मोठे प्रमाण आहे.

सदाशिव पेठेचा फेरफटका मारताना आता आपल्याला, नीलफलक असलेल्या वास्तू, उंच इमारतींमध्ये लपलेली मंदिरे, स्नॅक्स सेंटर, खानावळी आणि मोबाईल शॉपी भोवती रेंगाळणारी तरुणाई, अरुंद गल्ल्यांतील दुतर्फा पार्किंग, शाळांच्या आसपासची किलबिल, मांसाहारी आणि झटकेदार मिसळचे घमघमाट, अमृततुल्य भोवती रेंगाळणारी चहाबाज मंडळी, गजबजलेल्या बागांमध्ये रमलेले कुटुंब कबीले. हे सर्व दिसते. भारत आणि इतिहास संशोधनमध्ये येणाऱ्यांनी, आपले वेगळेपण जपले आहे. तरीदेखील वर्षांनुवर्षे बहुचर्चित राहिलेली सदाशिव पेठ आता आरोग्यदायी बाजारपेठ म्हणून सर्वदूर प्रसिद्ध होत आहे, ही वस्तुस्थिती सर्व जण मान्य करतात.बाजारपेठांची माहिती देण्यासाठी संदीप पारख आणि नरेंद्र अग्रवाल यांचे सहकार्य मोलाचे आहे. विक्रेत्यांच्या संघटनेचे सुरेश बाफना हे अध्यक्ष, तसेच विजय चोरडिया हे सेक्रेटरी आहेत. बच्चूभाई ओसवाल, विजय चंगेडिया, बाळासाहेब तापडिया, हरीभाई सावला अशी काही नावे या क्षेत्रामध्ये मान्यवर आहेत. सर्व जाती-धर्माची मंडळी या व्यवसायात असली तरी मुख्यत्वे जैन, माहेश्वरी, अग्रवाल मंडळींचे प्राबल्य या क्षेत्रात अधिक जाणवते. व्यवसायाबरोबरच समाजऋणाची जाणीवदेखील वाढते आहे ही बाब लक्षणीय वाटते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2017 2:05 am

Web Title: sadashiv peth pune
Next Stories
1 ‘जिंकण्यासाठी काहीपण’ हेच सूत्र
2 लोकांना मूर्ख बनवण्याचा शिवसेना-भाजपचा धंदा: राज ठाकरे
3 भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद; भोसरीत तणावाचे वातावरण
Just Now!
X