गेल्या काही दिवसांपासून अध्यक्षीय भाषणाची पुस्तिका छापण्यावरून साहित्य महामंडळ आणि श्रीपाल सबनीस यांच्यात सुरू असलेला वाद अखेर मिटला आहे. साहित्य महामंडळाने नमते घेत संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या भाषणाच्या १००० प्रती छापल्या. यापैकी २५ प्रती लगेचच सबनीस यांच्या घरी पाठवण्यात आल्या. त्यामुळे श्रीपाल सबनीस यांनी त्यांचे आजपासून सुरू होणारे उपोषण मागे घेतले आहे. काही दिवसांपूर्वीच साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषणाची पुस्तिका छापली नाही, तर येत्या २७ जानेवारी रोजी पत्नीसह पुण्यातील मराठी साहित्य परिषदेच्या कार्यालयाबाहेर आपण लाक्षणिक उपोषण करू, असा इशारा ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी दिला होता. अध्यक्षीय भाषणाची छपाई न केल्याबद्दल गुरुवारीच सबनीस यांनी साहित्य महामंडळाच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली होती. अध्यक्षीय भाषणाची पुस्तिका छापण्यासाठी सबनीसांनी महामंडळाला २६ जानेवारीपर्यंतची मुदत दिली होती. दरम्यान, सबनीस यांनी अध्यक्षीय भाषणाच्या प्रती छापल्याबद्दल साहित्य महामंडळाचे आभार मानले आहेत. आज साहित्य महामंडळ, सह्याद्री आणि साहित्यवेध प्रतिष्ठान या संस्थांकडून मिळून छापलेल्या भाषणाच्या ५००० प्रतींचे सबनीस यांच्या निवासस्थानी होणाऱ्या कार्यक्रमात प्रकाशन करण्यात येणार आहे.
पिंपरीमध्ये नुकत्याच झालेल्या या संमेलनाच्या उद्घाटनासाठी श्रीपाल सबनीस यांनी लिहून तयार केलेले भाषण न छापण्याचा निर्णय साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला होता. त्यांच्या या निर्णयावर टीका करताना सबनीस म्हणाल होते की, लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या अध्यक्षांचे भाषण छापले जात नाही. ते रसिकांपर्यंत पोहोचविले जात नाही. हा एकप्रकारे राज्यघटनेचा अवमान आहे. अशा पद्धतीने असहिष्णुतेने वागण्याची ठेकेदारी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना दिली कोणी? महामंडळ सेन्सॉर बोर्डासारखे कधीपासून वागायला लागले, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते.