महाविद्यालयीन युवकांच्या वाङ्मयीन कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी युवा संमेलन घेतले जावे, यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महांमडळाचे पदाधिकारी उत्सुक असून शनिवारी (३१ ऑक्टोबर) या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे. मात्र, हे संमेलन पुण्यात न घेता साहित्य महामंडळाचे कार्यालय स्थलांतरित होत असलेल्या विदर्भ साहित्य संघाच्या कार्यक्षेत्रामध्ये घेतले जावे, असा सूर व्यक्त केला जात आहे.
सासवड येथील साहित्य संमेलनामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी युवकांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळण्यासाठी युवा संमेलन घेण्याची आणि या संमेलनासाठी २५ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्याची घोषणा केली होती. या युवा संमेलनासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने पुढाकार घ्यावा, असा प्रस्ताव चव्हाण यांनी दिला होता. राज्य सरकारने जाहीर केलेल्या युवा धोरणामध्ये युवा संमेलनाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर, साहित्य संमेलनांचे यशस्वी आयोजन करण्याचा अनुभव गाठीशी असल्यामुळे साहित्य महामंडळानेच युवा संमेलन घ्यावे, असा शासकीय अध्यादेशही जारी करण्यात आला आहे. मात्र, या निधीची तरतूद ही सांस्कृतिक विभागाऐवजी क्रीडा आणि युवक कल्याण विभागामार्फत करण्यात आली होती. या दोन विभागांमध्ये सामंजस्याच्या अभावामुळे गेल्या वर्षी युवा संमेलन होऊ शकले नव्हते. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे युवा संमेलन घेण्यासंदर्भात विचारणा करणारे पत्र साहित्य महामंडळाला पाठविल्यानंतर पुन्हा एकदा हा विषय चर्चेस आला.
साहित्य महामंडळाच्या मागील बैठकीमध्ये आयत्या वेळचा विषय म्हणून युवा संमेलनाच्या आयोजनासंबंधी चर्चा झाली. मात्र, साहित्य महामंडळ हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, विश्व साहित्य संमेलन ही दोन संमेलने घेत असल्याने आणखी एका संमेलनाची जबाबदारी घेऊ नये, अशी भूमिका घेत एका ज्येष्ठ सदस्याने या प्रस्तावाला विरोध केला होता. या संमेलनांमुळे महामंडळाचे मराठी भाषा आणि साहित्य संवर्धनाचे काम गतीने होत नाही याकडे लक्ष वेधत सरकारची जबाबदारी आपण का अंगावर घ्यावी, अशी भूमिका मांडली गेली. मात्र, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या प्रचारासाठी युवा संमेलनाचा वापर होऊ शकतो हा मुद्दा विचारात घेऊन विरोध केला गेल्याची चर्चा साहित्य वर्तुळामध्ये आहे.
मात्र, सरकारने सोपविलेली युवा संमेलनाची जबाबदारी पार पाडावी असाच साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सूर आहे. त्यामुळे शनिवारी (३१ ऑक्टोबर) होत असलेल्या महामंडळाच्या बैठकीमध्ये युवा संमेलन हा विषय कार्यपत्रिकेवर घेण्यात आला आहे, अशी माहिती महामंडळाच्या सूत्रांनी दिली. युवा संमेलन पुण्यामध्ये घेण्यास विरोध असेल, तर राज्यभरात कोठेही घेता येऊ शकते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.