प्रत्येक गोष्टीत सढळ हाताने केलेला खर्च, महत्त्वाच्या व्यक्ती आणि ज्येष्ठ साहित्यिकांची सरबराई, त्यांची आलिशान व्यवस्था, डोळे दीपवून टाकणारा झगमगाट, ‘डीपीयू’ (डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी) या इंग्रजी अक्षरांनी रसिकांचे मराठी साहित्य संमेलनात होणारे स्वागत आणि संमेलन यशस्वी करण्यासाठी कोणतीच कसर न ठेवता वाटलेला रमणा अशा ‘अर्थवैशिष्टय़ां’सह पिंपरीतील बहुचíचत साहित्य संमेलनाची शुक्रवारी सुरुवात झाली. त्यामुळे आता उर्वरित तीन दिवसात आणखी काय-काय पाहायला मिळेल, याचे आडाखे साहित्य रसिक बांधत असून संमेलनासाठी करण्यात आलेल्या कोटय़वधींच्या खर्चाची आणि भव्यतेचीच चर्चा संमेलनात सर्वत्र सुरू झाली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पिंपरीच्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाची यजमान संस्था म्हणून निवड झाली, तेव्हाच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या इतिहासात हे सर्वाधिक खíचक संमेलन होणार, याची नांदी झाली होती. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेली तयारी पाहता पिंपरीकरांना त्याची प्रचिती येत होती. मात्र, त्याची अनुभूती शुक्रवारी पहिल्याच दिवशी आली. संमेलनाच्या ग्रंथिदडीत विद्यापीठात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहभागामुळे दिंडीची लांबी वाढली. मात्र, या ग्रंथदिंडीत स्थानिक नागरिक व सामान्य रसिकांचा सहभाग नव्हता, हे स्पष्टपणे दिसून येत हेते. ग्रंथदिंडीच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहून स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस आणि साहित्य महामंडळाचे पदाधिकारी िदडी मार्गाला लावून पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले. त्यामुळे ग्रंथदिंडीत केवळ विद्यार्थी व शिक्षकच सहभागी उरले हेते.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी (१६ जानेवारी) सकाळी दहा वाजता साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार असून दुसऱ्याच दिवशी त्यांची प्रकट मुलाखतही होणार आहे. ज्येष्ठ कवी गुलजार, जावेद अख्तर यांच्यासह ज्ञानपीठ पुरस्कारविजेते साहित्यिक आणि ज्येष्ठ पाश्र्वगायिका आशा भोसले रजनी अशा कार्यक्रमांना गर्दी होणार हे नक्की असले तरी त्यासाठी किती खर्च आला याची चर्चा कुजबूज स्वरूपात सगळीकडे सुरू आहे. खर्चाची कोटीच्या कोटीची उड्डाणे ही उक्ती सार्थ ठरविणारे हे संमेलन अभूतपूर्व होणार यात शंकाच नाही. विद्यमान, मागील वर्षीचे तसेच अंदमान येथील संमेलनाध्यक्षांना प्रत्येकी पाच लाख रुपये, तर सर्व हयात माजी संमेलनाध्यक्षांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा निधीही पाटील यांनी जाहीर केला आहे. संमेलनातील कार्यक्रमात भाग घेण्यासाठी निमंत्रित केलेल्या निवडक साहित्यिकांना काही लाख रुपयांचे मानधन देण्यात येणार असल्याचीही चर्चा संमेलनस्थळी सुरू आहे.
पिंपरीतील एचए कंपनीच्या ४० एकर जागेत होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाची जय्यत तयारी गेल्या महिन्यापासून सुरू होती. संमेलनाशी संबंधित प्रत्येक गोष्टीत आयोजकांची श्रीमंती स्पष्टपणे दिसून येत आहे. संमेलनाच्या ठिकाणी जाणाऱ्या मार्गावर जाहिरात फलक तसेच मोठमोठे होìडग लागलेले आहेत. संमेलननगरीच्या प्रवेशद्वाराजवळ संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या भव्य प्रतिकृती सर्वाचे लक्ष वेधून घेत होत्या. जवळपास ८० फूट लांब व पाच फूट जाडीच्या फाऊन्टन पेनची प्रतिकृती उभारण्यात आली असून हेच संमेलनाचे बोधचिन्ह आहे. एकूण मदानात रंगीबिरंगी अशा तब्बल १२०० दिव्यांच्या झगमगाटातून डोळे दिपून जात असल्याचा अनुभव उपस्थितांनी घेतला. मुख्य मंडपात १२० फुटी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले असून त्यावर २०० हून अधिक एलईडी दिवे लावण्यात आले आहेत. तसेच, सर्व मंडप मिळून १३ एलईडी स्क्रीन आहेत. संमेलनाला येणाऱ्या
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी पंचतारांकित हॉटेलला लाजवेल अशी आलिशान व्यवस्था मुख्य मंडपालगतच करण्यात आली आहे. प्रवेशद्वारापासून प्रत्येक मंडपात जाण्यासाठीच्या विविध मार्गावर अनेक रंगांचे गालिचे अंथरण्यात आले आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त असताना खासगी २०० सुरक्षारक्षक (बाऊन्सर) तनात करण्यात आले आहेत. वीजपुरवठा खंडीत होण्याची शक्यता गृहीत धरून कार्यक्रमाच्या ठिकाणी सगळीकडे जनरेटरची व्यवस्था आहे. पिण्याच्या पाण्यासाठी मिनरल वॉटरचा भरमसाठ साठा करून ठेवण्यात आला होता. संमेलनाला येण्यासाठी स्वतंत्र बसव्यवस्थाही आहे.

हवसे, नवसे, गवशे
अन् ‘सेल्फी’ साठी चढाओढ
िपपरीतील एचए कॉलनीच्या मैदानात मराठी साहित्य संमेलनाला शुक्रवारी प्रारंभ झाला आणि पहिल्याच दिवशी हवसे, नवसे आणि गवश्यांचा सहभाग संमेलनस्थळी दिसून आला. डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ हेच आयोजक असल्याने संस्थेचे विद्यार्थी ‘घरचे कार्य’ आहे, असे समजून मोठय़ा संख्येने सहभागी झाले. दुपारी ग्रंथदिंडी सुरू झाल्यापासून ते रात्री दहापर्यंत विद्यार्थ्यांमध्ये सेल्फी काढण्याची चढाओढ जागोजागी दिसून येत होती.
संमेलनासाठी उभारण्यात आलेली साहित्यनगरी आकर्षक पध्दतीने सजवण्यात आली होती. धूळ उडू नये म्हणून मैदानात सर्वत्र पायघडय़ा अंथरण्यात आल्या होत्या. संतांच्या प्रतिकृती लक्षवेधक होत्या. एलईडी दिव्यांच्या लखलखाटामुळे परिसर उजळून निघाला होता. पहिल्याच दिवशी मोठय़ा प्रमाणात गर्दी होती. त्यामध्ये सर्व प्रकारची मंडळी सहभागी झालेली दिसून येत होती. येथील प्रसन्न वातावरणात आपले छायाचित्र काढावे, असे तरुणाईला वाटले नाही तरच नवल. दुपारपासून संमेलनस्थळी गटागटाने येणाऱ्या तरुणांचा एकच कार्यक्रम दिसून येत होता, तो म्हणजे सेल्फी काढण्याचा. मुले व मुली वेगवेगळे आणि एकत्रितपणे छायाचित्र काढत होते. त्यामध्ये संमेलनासाठी आलेले नागरिक व रसिकही सहभागी झाले होते. एकीकडे, मंडपात कार्यक्रम सुरू असला तरी अनेक विद्यार्थ्यांना त्याच्याशी काही घेणं-देणं नसल्याचे दिसून येत होते. सर्व कार्यक्रम संपले तरी रात्री उशिरापर्यंत सेल्फी काढण्याचा कार्यक्रम सुरूच होता. संमेलनाच्या निमित्ताने तरुणाईमध्ये असलेली सेल्फीची क्रेझ प्राकर्षांने दिसून आली.

संकेताचा भंग आणि वाङ्मयीन सूर
साहित्य संमेलनाअंतर्गत ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन प्रथेनुसार मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते होणार होते. तसे निमंत्रण पत्रिकेत नमूद करण्यात आले होते. प्रत्यक्षात, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार िशदे यांनी ते उद्घाटन केले. कार्यक्रमाच्या ठिकाणी बरीच गर्दी झाल्याने िशदे यांनी कधी फीत कापली, ते कोणाच्याही लक्षात आले नाही. त्यामुळे वर्षांनुवर्षे असलेल्या प्रथेचा भंग झाला. त्यानंतरच्या कार्यक्रमात िशदे यांच्या हस्ते यू. म. पठाण, मधु मंगेश कर्णिक, डॉ. द. भि. कुलकर्णी, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, फ. मुं. िशदे या माजी संमेलनाध्यक्षांसह, विश्वसाहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. शेषराव मोरे, माजी अध्यक्ष गंगाधर पानतावणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस, स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील आदी उपस्थित होते. यावेळी साहित्य संमेलनातून वाङ्मयीन सूरच उमटला पाहिजे, अशी अपेक्षा पानतावणे यांनी व्यक्त केली.