आगामी साहित्य संमेलनाचे स्थळ जवळपास निश्चित ठरले असले तरी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची स्थळ निवड समिती शनिवारी (१३ जुलै) सासवड आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही स्थळांना भेट देणार आहे. साहित्य महामंडळाच्या रविवारी (१४ जुलै) होणाऱ्या बैठकीमध्ये अंतिम स्थळाची घोषणा होणार आहे.
चिपळूण येथील साहित्य संमेलनाच्या सांगता कार्यक्रमात साहित्य महामंडळाच्या तत्कालीन अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी आगामी संमेलनासाठी सासवड आणि पिंपरी-चिंचवड अशी दोन निमंत्रणे आली असल्याचे सांगितले होते. संमेलनासाठी महामंडळाकडे निमंत्रण पाठविण्याची मुदत ३१ मार्च रोजी संपली. तेव्हा हीच दोन निमंत्रणे कायम होती. त्यानंतर महामंडळाचे कार्यालय एक एप्रिलपासून तीन वर्षांसाठी पुण्यामध्ये स्थलांतरित झाले. सासवड येथील आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान आणि पिंपरी-चिंचवड येथील लेखक-कवींच्या समूहाने दिलेले, अशी दोन निमंत्रणे आहेत.महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आता या दोन स्थळांतूनच निवड करावयाची आहे.
साहित्य महामंडळाच्या घटनेनुसार नोंदणीकृत संस्थेकडून आलेले निमंत्रण ग्राह्य़ धरले जाते. त्या निकषानुसार पिंपरी-चिंचवड येथून आलेले निमंत्रण बाद ठरू शकते. ही बाब ध्यानात आल्यानंतर पिंपरी येथील साहित्यिकांच्या गटाने महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेच्या माध्यमातून साहित्य महामंडळाकडे निमंत्रण सादर केले. मात्र, पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होत असून त्याची आचारसंहिता संमेलनाचे आयोजन करण्यामध्ये अडसर ठरू शकते, हा साक्षात्कार त्यांना झाला. त्यातूनच हे संमेलन घेण्यास असमर्थ असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या पाश्र्वभूमीवर साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य म्हणाल्या,‘‘पिंपरी-चिंचवड येथील लोकांनी संमेलन नाकारल्यासंदर्भात अद्याप साहित्य महामंडळाला कोणतीही लेखी सूचना दिलेली नाही. त्यामुळे महामंडळाच्यादृष्टीने त्यांचे निमंत्रण अजूनही कायम आहे. महामंडळाच्या स्थळ निवड समितीमध्ये चर्चा करून महामंडळाच्या घटनेनुसार समिती दोन्ही स्थळांना भेट देईल. ही समिती आपला अहवाल महामंडळाला सादर करेल. रविवारी होणाऱ्या महामंडळाच्या बैठकीमध्ये अंतिम स्थळाची घोषणा करण्यात येईल.’’