सह्य़ाद्री रुग्णालयातील यंत्रणेचा नातेवाइकांना मनस्ताप

पुणे : रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर हिशोब प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी झालेल्या अनेक तासांच्या विलंबामुळे मृतदेह ताब्यात मिळण्यासाठी ६ ते ८ तास प्रतीक्षा करावी लागल्याच्या घटना घडत आहेत. पुण्याच्या सह्य़ाद्री मल्टीस्पेशालिटी रुग्णालयातील अशाच एका घटनेबाबत, रुग्णालयाने मात्र,  ‘रुग्ण दीर्घकाळ रुग्णालयात वास्तव्यास असेल, तर कागदपत्रांची पडताळणी आणि हिशोबाला विलंब होतो, तो दूर करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे’ मत व्यक्त केले आहे.

रुग्णाचे नातेवाईक न. म. करंदीकर म्हणाले, माझ्या सासूबाई प्रभा जोशी यांना कर्करोगाच्या उपचारांसाठी १६ एप्रिल रोजी सह्य़ाद्रीमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी चांगले उपचार केले, मात्र रुग्णाचे निधन झाल्यानंतर हिशोबास वेळ लागत असल्याचे कारण देत मृतदेह ताब्यात मिळण्यासाठी आम्हाला सुमारे साडेसहा तास प्रतीक्षा करावी लागली. दररोज झालेल्या खर्चाचा आकडा नोंदवहीत नोंदवून त्यापुढे नातेवाइकांची स्वाक्षरी घेतली जात असताना एवढा वेळ का असे विचारले असता ‘नोंद वहीमध्ये नोंदवलेले आकडे मोघम असतात, त्यांचा प्रत्यक्ष बिलाशी काही संबंध नाही,’असे धक्कादायक उत्तर मिळाले. रुग्णालय प्रशासनाकडून शेवटचे बिल देताना परत करावयाच्या रकमेबद्दलही नातेवाइकांना माहिती दिली जात नसल्याचा अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या आणि तिसऱ्या पाळीमध्ये कमी कर्मचारी कामावर असल्याने ही दिरंगाई होत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आल्याने रुग्णांनी त्यांच्या पाळ्या बघून मरायचे का, अशा शब्दांत करंदीकर यांनी संताप व्यक्त केला.

सौरभ मराठे यांची आई सुजाता मराठे या कर्करोगाचे उपचार घेण्यासाठी सुमारे दोन महिने याच रुग्णालयात दाखल होत्या. पहाटे पाच वाजता त्यांचे निधन झाले. सौरभ म्हणाले, ‘निधन झाल्यानंतर तिचा मृतदेह ताब्यात मिळायला दुपारचे साडेबारा होऊन गेले होते. बिलिंगची प्रक्रिया वेळखाऊ आहे, व्यवस्थापनाकडून होणाऱ्या दिरंगाईवर प्रशासनाचा कोणताही अंकुश नाही. कुटुंबातील जवळच्या व्यक्तीचे निधन झालेले असताना ही दिरंगाई क्लेशदायक आहे.

रुग्णालय प्रशासन प्रयत्नशील

या दोन्ही अनुभवांबाबत रुग्णालय प्रशासनाकडे विचारणा केली असता, हे दोन्ही रुग्ण दीर्घकाळ रुग्णालयात दाखल असल्याने अनेक कागदपत्रांची पूर्तता करायची असल्याने ‘डिस्चार्ज’ प्रक्रियेला वेळ लागला. जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर काही मिनिटे थांबणे अवघड असते, याची जाणीव असल्याने प्रक्रिया जलदगतीने करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे सांगण्यात आले.