संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांचे मत

मानवी आयुष्यात प्रत्येक जण एकमेकांवर अवलंबून असतात. त्यामुळे परस्परांमध्ये सहकार्य वृद्धिंगत करीत साहित्य व्यवहार पुढे नेण्याची आवश्यकता आहे. साहित्य व्यवहारातील लेखक-प्रकाशक-वाचक ही जैविक साखळी अबाधित ठेवण्यासाठी यातील प्रत्येक घटकाने प्रयत्नशील राहिले पाहिजे, असे मत संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे साहित्य संमेलनाध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते लातूर येथील भारतीय पुस्तकालयाचे संस्थापक-संचालक भानुदास जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार, तर ज्येष्ठ विज्ञान लेखक निरंजन घाटे यांना साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी मोरे बोलेत होते. प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, उपाध्यक्ष शशिकला उपाध्ये उपस्थित होते. उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती आणि उत्कृष्ट दिवाळी अंक निर्मिती पुरस्कारांचे वितरण या वेळी  करण्यात आले.

मोरे म्हणाले, स्वावलंबनाप्रमाणे परस्पर अवलंबन हेदेखील एक मूल्य आहे. त्याचा आदर राखत प्रत्येक घटकाने आपआपले काम करावे. महाराष्ट्रातील प्रकाशन संस्कृतीवर गांभीर्याने काम होणे गरजेचे आहे. प्रकाशन व्यवसाय व्रत म्हणून निष्ठेने करणाऱ्या प्रकाशकांच्या ऋणातच आपण राहिले पाहिजे.  ढेरे म्हणाल्या, तांत्रिक प्रगतीच्या झंझावामध्ये प्रकाशन व्यवसायात टिकून राहणे सोपे नाही. अनेक आव्हाने उभी राहिली असताना प्रकाशन व्यवसायात अशा जिद्दीने काम करणारी व्यक्तिमत्त्वे आहेत. सांस्कृतिक वारसा जपून तो पुढील पिढीला हस्तांतरित करण्यामध्ये प्रकाशकांचे मोठे योगदान आहे.

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते भानुदास जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार आणि निरंजन घाटे यांना साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला. शशिकला उपाध्ये, सविता घाटे, डॉ. सदानंद मोरे, राजीव बर्वे या वेळी उपस्थित होते.