शासकीय यंत्रणेच्या कागदी घोडय़ांमुळे भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह

पिंपरी

वारकरी सांप्रदायातील सर्व कलागुणांचे जतन, शिक्षण व प्रसार होण्याचा हेतू डोळ्यासमोर ठेवून मोठा गाजावाजा करत चिखलीत संतपीठ उभारण्याची घोषणा पिंपरी पालिकेने केली. मात्र, पाच वर्षांनंतरही संतपीठास मुहूर्त मिळालेला नाही. देहू-आळंदीच्या कुशीत संत तुकाराम महाराज यांच्या नावाने सुरू होणाऱ्या या संतपीठासाठी शासकीय यंत्रणेकडून प्रतिसाद न मिळाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच, पिंपरी पालिकेत सत्तांतर झाल्यानंतर नव्या कारभाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने संतपीठाच्या भवितव्याविषयी साशंकता निर्माण झाली आहे.

चिखलीत तुकोबांचे वास्तव्य होते. पंचक्रोशीत मोठय़ा प्रमाणात वारकरी राहतात. अशा आध्यात्मिक वारसा लाभलेल्या ठिकाणी गायरानाच्या आठ एकर जागेत हे संतपीठ सुरू करण्याचे नियोजन होते. भागवत धर्मामध्ये वादन, कीर्तन, गायन, प्रवचन आदी कला अवगत करण्यासाठी नवीन पिढीला प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे सांगत पालिकेच्या ‘संगीत अकादमी’च्या धर्तीवर संतपीठाची संकल्पना मांडण्यात आली. त्यासाठी चार वर्षांचा अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी तज्ज्ञांची व अभ्यासकांची समिती नियुक्त करण्यात आली. स्थानिक नगरसेवक दत्ता साने आणि सेवानिवृत्त अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांनी संतपीठासाठी सातत्याने पाठपुरावा केला. पालिकेने याबाबतचा प्रस्ताव मंजूर केला. पहिल्या टप्प्यात दोन कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली होती. संतपीठासाठी अनेक बैठका झाल्या, वारंवार चर्चा झाल्या, पाहणी दौरे पार पडले. शासकीय यंत्रणेकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. केवळ कागदी घोडे नाचवण्याचे काम होत राहिल्याने प्रत्यक्ष काम सुरू होऊ शकले नाही. बदलत्या राजकीय परिस्थितीत, संतपीठ सुरू होईल की नाही, या विषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.

संतपीठाच्या माध्यमातून वारकरी सांप्रदायाला अधिकृत व्यासपीठ मिळणार असून समाजाच्या शुद्धीकरणाचे हे पहिले पाऊल आहे. संतपीठाचा संकल्प मोठा आणि महाराष्ट्रात संतपरंपरेचा पाया बळकट करणारा आहे. संतांची शिकवण सर्वासाठी उपयुक्त ठरेल, अशाप्रकारच्या भावना या क्षेत्रातील अभ्यासकांनी व्यक्त केल्या होत्या. तर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी, संतपीठामध्ये सातवाहन कालापासून ते २१ व्या शतकापर्यंतच्या संत साहित्याचा अभ्यास व मराठी संस्कृतीचे संशोधन केले जावे. केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील सर्वधर्मीय संतांच्या साहित्याचा अभ्यास व्हावा, त्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून

द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

शासकीय दिरंगाईचा वाईट अनुभव

साडेआठ एकरात संतपीठ उभारण्याचे नियोजन होते, त्यापैकी चार एकर जागाच ताब्यात मिळू शकली. या प्रक्रियेत शासनाच्या दिरंगाई धोरणाचा खूपच वाईट अनुभव आला. संतपीठासाठी दोन कोटींची प्राथमिक तरतूद आहे. पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता होती, तोपर्यंत शरद पवार, अजित पवार यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला जात होता. सत्तांतर झाल्यानंतर सगळीच प्रक्रिया ठप्प झाल्यासारखे दिसते. यापूर्वीचे आयुक्त राजीव जाधव सकारात्मक होते. बैठका, चर्चा होत होत्या. आता तसे काहीच नसल्याने या प्रकल्पाच्या भवितव्याविषयी साशंकता निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी व्यक्त केली आहे.

संतपीठाचा अभ्यासक्रम

पहिल्या वर्षांत व्याकरण मराठी पुस्तक, संस्कृत भांडारकर पुस्तक (१२ पाठ), श्रीमद्भगवतगीता संथा व विष्णूसहस्रनाम, ज्ञानेश्वरी अध्याय बारावा पूर्ण व नवव्या अध्यायातील ५० ओव्या, वारकरी भजनाचा समावेश आहे. दुसऱ्या वर्षांत विचारसागर, गीता संपूर्ण अन्वय अर्थासह, ज्ञानेश्वरीचा नववा अध्याय, ५१ पासून पुढे ओवी, भजनसंग्रहातील वाराचे व जन्माचे संपूर्ण अभंग समाविष्ट आहेत. तिसऱ्या वर्षांत सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय, पंचदशी प्रकरणे १ ते सात, ज्ञानेश्वरीतील १५ वा अध्याय, भजनसंग्रहातील नाटाचे अभंग असून चौथ्या वर्षांत ज्ञानेश्वरी अध्याय १३ ते १८, पंचदशी प्रकरण ८ ते १५, ज्ञानेश्वरी पाचवा व सातवा अध्याय, गाथेतील संतपर प्रकरण आणि आठवडय़ातील तीन दिवस कीर्तन असा अभ्यासक्रम राहणार असल्याचे याबाबतच्या मूळ प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.