महापालिकेतर्फे दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी पालकांचे आधार कार्ड मागण्यात आले असून, ही अन्यायकारक अट तातडीने काढून टाकावी, अशी मागणी सजग नागरिक मंचतर्फे करण्यात आली आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षेत ऐंशी टक्क्य़ांच्यावर गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना महापालिकेतर्फे शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना जी कागदपत्र जोडणे आवश्यक आहे, त्यात पालकांच्या आधार कार्डची झेरॉक्स जोडण्यास सांगण्यात आली आहे. या अटीमुळे अनेक गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहतील, असे पत्र सजग नागरिक मंचतर्फे सोमवारी आयुक्तांना देण्यात आले. आधार कार्ड अनिवार्य नाही आणि आधार कार्ड नसलेल्या लाभार्थीना वंचित ठेवले जाणार नाही, असे केंद्र सरकार आणि राज्य शासनाने वेळोवेळी जाहीर केलेले असताना महापालिकेने ही सक्ती करण्याचे कारण काय, असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
आधार कार्ड योजना शहरात नक्की कोणत्या भागात सुरू आहे याचीही माहिती अद्याप पुणेकरांना नाही. सर्व प्रभागांमध्ये ही केंदं्र सुरू नाहीत. अशा परिस्थितीत अद्याप सर्व नागरिकांना आधार कार्ड मिळालेले नाही. त्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांना पालकांच्या आधार कार्डची जी सक्ती करण्यात आली आहे ती रद्द करावी, अशीही विनंती आयुक्तांना करण्यात आली आहे.