उसाला रास्त आधारभूत दर (एफआरपी) देण्याच्या मागणीसाठी साखर आयुक्तांना भेटण्यासाठी गेलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील साखर संकुलाची सोमवारी दुपारी तोडफोड केली. या कार्यकर्त्यांसह संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांना पोलिसांनी अटक केली. त्यांना अटक केल्याचे समजताच कार्यकर्त्यांनी साखर संकुलासमोरील एक मोटारही पेटवून दिली. त्यामुळे शिवाजीनगर परिसरात तणावाचे वातावरण होते. या घटनेचे राज्याच्या काही भागात पडसात देखील उमटले.
राज्यात अनेक कारखान्यांनी उसाला12sakhar1 रास्त आधारभूत किमतीपेक्षा कमी भाव देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे खासदार शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते सोमवारी दुपारी साखर आयुक्तांना भेटण्यासाठी साखर संकुल येथे गेले. शेट्टी यांच्यासोबत सदाभाऊ खोत आणि सुमारे शंभर कार्यकर्ते होते. त्यांनी, साखर आयुक्तांनी खाली येऊन कार्यकर्त्यांची भेट घेण्याची मागणी केली. मात्र, साखर आयुक्तांनी भेटण्यासाठी काही जणांना त्यांच्या कार्यालयात बोलविले. आयुक्तांनी खाली येऊन भेट घेण्यास नकार दिल्यामुळे संकुलाच्या आवारात ठिय्या आंदोलन सुरू केले. तासभर बसल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी अडथळे तोडून साखर संकुलाकडे धाव घेतली. काचांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. काही कार्यकर्त्यांनी संकुलासमोरील झाडांच्या कुंडय़ा फोडल्या. पोलिसांनी हस्तक्षेप करून तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. कार्यकर्त्यांना अटक केल्याचे समजल्यानंतर शेट्टी यांनी स्वत:ला अटक करवून घेतली. शेट्टींना अटक केल्याचे समजताच बाहेर कार्यकर्त्यांनी एक मोटार पेटवून दिली. पोलिस शेट्टी व इतर कार्यकर्त्यांना अटक करून स्वारगेट येथील नेहरू स्टेडियम या ठिकाणी घेऊन गेले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त सतीश माथुर यांनी घटनास्थळी भेट दिली. या ठिकाणचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
आंदोलनाच्या वेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, की अनेक कारखान्यांनी एफआरपी प्रमाणे भाव दिलेले नाहीत. त्यांच्या विरोधात कारवाई करून त्या कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करावे. त्याबरोबर एफआरपी प्रमाणे शेतक ऱ्यांना भाव द्यावा.