मार्केट यार्डातील तीन अडत्यांवर कारवाई

पुणे : कर्नाटकातील आंबा देवगड हापूस म्हणून ग्राहकांना विक्री करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. मार्केट यार्डातील तीन अडत्यांनी देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटक हापूसची विक्री केल्याचा प्रकार बाजार समितीने उघडकीस आणल्यानंतर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले. तीन अडत्यांकडून १७ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

कोकणातील हापूस आंब्याची बाजारात आवक वाढली आहे. मार्केट यार्डात खरेदीसाठी येणाऱ्या किरकोळ विक्रेते आणि घरगुती ग्राहकांना हापूसच्या नावाखाली कर्नाटक आंब्याची विक्री करण्यात येत असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर पणन संचालक सतीश सोनी यांनी अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कारवाईचे आदेश दिले आहे. याबाबत सोनी यांनी नुकतेच बाजार समितीला परिपत्रक पाठविले आहे. याबाबत बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी आंबा व्यापाऱ्यांनी सूचना दिल्या होत्या. गरड यांनी आंबा बाजाराला भेट दिली. त्या वेळी काही अडते कर्नाटकातील आंब्याची देवगड हापूस म्हणून विक्री करत असल्याचा प्रकार उघडकीस आला. देवगड हापूस आंब्याच्या पेटीत कर्नाटकातील आंबा भरून त्याची विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर एच. बी. बागवान, नॅशनल फ्रुट, लोकुमल नारायणदास पंजाबी या फळबाजारातील तीन अडत्यांवर कारवाई करण्यात आली.

थेट गुन्हे दाखल होणार

मार्केट यार्डातील तीन अडत्यांना कर्नाटक आंब्याची देवगड हापूस म्हणून विक्री करताना पकडण्यात आल्यानंतर पहिल्यांदा त्यांच्याकडून पाच हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. असाच प्रकार पुन्हा केल्यास दहा हजार दंड ठोठावण्यात येणार आहे. फसवणुकीचा प्रकार पुन्हा केल्यास थेट गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी दिला आहे.

कर्नाटकातील आंबा देवगड हापूस आंबा म्हणून विक्री केला जात असल्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्यातील सर्व बाजार समित्यांना पणन संचालक सतीश सोनी यांनी परिपत्रक पाठविले आहे. फसवणुकीच्या प्रकारांना आळा घालण्याचे आदेश परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहेत.

– मधुकांत गरड, प्रशासक, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती