ग्राहकांना आता आपल्या सोसायटीच्या दारात चक्क एअर कंडिशन्ड व्हॅनमधून आलेली भाजी मिळू शकणार आहे. थंड वातावरणात राहिल्यामुळे ही भाजी ताजी तर राहीलच पण ती थेट शेतकऱ्यांकडून ग्राहकांपर्यंत पोहोचल्याने शेतकऱ्यांनाही चांगला भाव मिळू शकणार आहे.
‘महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळा’तर्फे शेतीमालाच्या विक्री व्यवस्थेसाठी अनुदान दिले जाते. या योजनेअंतर्गत ‘कपिला कृषक डायरेक्ट मार्केटिंग असोसिएशन’मार्फत शहरात दहा मोठय़ा एसी व्हॅन्स आणि दहा लहान व्हॅन्समधून भाजीविक्री करण्यास सुरुवात झाली आहे. सध्या कोथरूड आणि कर्वेनगर भागांतील वीस सोसायटय़ांना या उपक्रमाचा लाभ मिळत आहे. ही भाजी सासवड, जुन्नर आणि उरळीकांचन येथील शेतकऱ्यांकडून येते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत चांदणे यांनी ही माहिती दिली.
चांदणे म्हणाले, ‘‘उद्योजक शेतकऱ्यांना भाजी ताजी ठेवण्याची विशिष्ट व्यवस्था असणाऱ्या गाडय़ा बनवून देणे, त्यांना रस्त्यावर गाडय़ा उभ्या करण्यासाठी परवानगी मिळवून देणे, ही कामे संस्था करीत आहे. एकाच सोसायटीत दोन भाजी विक्री व्हॅन गेल्यामुळे समस्या निर्माण होऊ नये, याचीही काळजी संस्थेतर्फे घेण्यात येणार आहे. भाजी थेट शेतकऱ्यांकडून ग्राहकांपर्यंत पोहोचल्याने ग्राहकांना ताजी आणि स्वस्त भाजी मिळेल. तसेच शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल. सध्या १०-१२ महिला बचत गट संस्थेबरोबर काम करण्यास तयार असून भाजी विक्री व्हॅन्सवर या गटांनी बनवलेली उत्पादनेही विक्रीस ठेवता येतील. विकली न गेलेली भाजी वाया जाऊ नये यासाठी ‘डिहायड्रेशन प्लँट’ सुरू करण्यास सहाय्य करण्याचाही संस्थेचा विचार आहे.’’
 ‘मिस्ट’ यंत्रणा ठेवणार भाजी ताजी
संस्थेने बनवलेल्या मोठय़ा भाजी विक्री व्हॅन्स एअर कंडिशन्ड आहेत तर लहान व्हॅन्समध्ये ‘मिस्ट’ ही भाजी ताजी ठेवणारी यंत्रणा बसवण्यात आली आहे. या यंत्रणेत भाजीवरील पाण्याचे रुपांतर दवासारख्या बारीक कणांत होऊन भाज्यांना आवश्यक तो ओलावा मिळून त्या ताज्या राहतात. हिरव्या पालेभाज्यांसाठी ही यंत्रणा विशेष उपयुक्त ठरते.