सॅलिसबरी पार्क येथील उद्यानासाठी आरक्षित असलेली ७२ हजार चौरस फूट एवढी जागा अखेर महापालिकेच्या ताब्यात आली असून ही जागा मिळवण्यासाठी गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या नागरिकांच्या लढय़ाला त्यामुळे यश आले आहे. स्थानिक नागरिकांनी या जागेवर एकत्र येत शनिवारी आनंदोत्सव साजरा केला. तसेच सॅलिसबरी पार्क रेसिडेन्स फोरमतर्फेही रविवारी (१३ मार्च) आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे.
संबंधित जागेवर महापालिकेने १९८७ च्या विकास आराखडय़ात उद्यानासाठी आरक्षण दर्शवले होते. मात्र हे आरक्षण उठवून ती निवासी करण्याचा घाट घालण्यात आला होता. एक्सप्रेस सिटिझन फोरम तसेच सॅलिसबरी पार्क रेसिडेन्स फोरम यांनी त्या विरोधात सातत्याने आवाज उठवला. या जागेवर आरक्षणाप्रमाणे उद्यानच झाले पाहिजे या मागणीसाठी नागरिकांच्या वतीने अ‍ॅड. एन. पी. भोग यांनीही दीर्घकाळ न्यायालयीन प्रक्रिया सुरू ठेवली. स्थानिक नगरसेवक श्रीनाथ भिमाले हेही गेली बारा वर्षे ही जागा महापालिकेने ताब्यात घ्यावी यासाठी प्रयत्न करत होते. या जागेवरील आरक्षण उठवण्याच्या विरोधात त्यांनी मोठे आंदोलनही वेळोवेळी केले होते. तसेच महापालिकेतही सातत्याने पाठपुरावा केला होता.
आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदन
मूळ मालकांना नुकसान भरपाई म्हणून देण्यासाठी या जागेचे मूल्य सहा कोटी इतके असल्याचे महापालिकेचे म्हणणे होते. त्यानंतर तडजोड शुल्क म्हणून अठरा कोटी रुपये देण्याची तयारी महापालिकेने दर्शवली व तेवढी रक्कम महापालिकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा केली. ही रक्कम जमा करताच जिल्हा प्रशासनाने वेगाने कार्यवाही केली आणि अवघ्या आठ दिवसात महापालिकेने जागेचा प्रत्यक्ष ताबा घेतला. महापालिका आयुक्त कुणाल कुमार आणि जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी या विषयाला प्राधान्य दिल्यामुळेच हे शक्य झाले, असे नगरसेवक भिमाले यांनी शनिवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. महापालिकेने ही जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया शुक्रवारी पूर्ण केली. उद्यानासाठीची जागा ताब्यात आल्यामुळे स्थानिक नागरिकांनी शनिवारी आनंद साजरा केला.
रहिवाशांतर्फे आज आनंदोत्सव
सॅलिसबरी पार्क येथील आरक्षित जागा ताब्यात यावी यासाठी स्थानिक नागरिकांनी जो लढा दिला त्याला यश आले असून रविवारी सर्व नागरिक एकत्र येऊन आनंद साजरा करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यां विनिता देशमुख यांनी सांगितले. देशमुख यांच्यासह फोरमचे फैजल पूनावाला तसेच अ‍ॅड. एन. पी. भोग, व्ही. पी. तनेजा, संजय पवार आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल.