एका दिवसात १३०० प्रेक्षकांचा प्रतिसाद; र. धों. कर्वे यांच्या कार्याचा वेध घेणारे नाटक

अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य, लैंगिक स्वातंत्र्य या विषयांवर मूलगामी लेखन असलेल्या र. धों. कर्वे यांच्या कार्याचा वेध घेणारे नाटकघर निर्मित ‘समाजस्वास्थ्य’ नाटक आता इंग्रजी उपशीर्षकांसह (सबटायटल्स) ‘यूटय़ूब’वर ठेवण्यात आले आहे. फक्त एका दिवसातच जगभरातील १३०० प्रेक्षकांनी हे नाटक पाहिले आहे.

र. धों. कर्वे यांनी सुरू केलेल्या ‘समाजस्वास्थ्य’ या मासिकाला रविवारी (१५ जुलै) ९० वर्षे पूर्ण झाली. हे औचित्य साधून नाटकघर निर्मित ‘समाजस्वास्थ्य’ नाटक रविवारी यूटय़ूबवर ठेवण्यात आले. अजित दळवी यांनी लिहिलेल्या आणि अतुल पेठे यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकाचे गेल्या १६ महिन्यांत विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवांसह राज्यभरात मिळून ७६ प्रयोग झाले आहेत. आतापर्यंत सुमारे ३० हजारांहून अधिक प्रेक्षकांनी हे नाटक पाहिले आहे. आमच्या यंत्रणेनुसार या नाटकाचे प्रयोग करण्याच्या शक्यता संपल्या आहेत. त्यामुळे हा अर्धविराम असून भविष्यात कोणत्या संस्थेने निमंत्रित केले तर, नाटकाचा प्रयोग नक्की करू, असे अतुल पेठे यांनी सांगितले. हे नाटक आता यूटय़ूबच्या माध्यमातून सर्वासाठी खुले करण्यात आले आहे. शासनाच्या सांस्कृतिक विभागाने या नाटकाला आर्थिक पाठबळ दिले, तर नाटकाचे आणखी प्रयोग करता येणे शक्य होईल, याकडे पेठे यांनी लक्ष वेधले.

पेठे म्हणाले, र. धों. कर्वे यांनी १५ जुलै १९२७ रोजी ‘समाजस्वास्थ्य’ या बंडखोर पुरोगामी मासिकाचा प्रारंभ केला. व्यक्तीच्या व समाजाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासंबंधीच्या उपायांची चर्चा करण्याच्या हेतूने काढलेले हे मासिक कर्वे यांनी खिशाला खार लावून २६ वर्ष ४ महिने प्रकाशित केले. त्यातील अनेक लेख वादग्रस्त ठरले आणि मासिकावर खटलेही भरले गेले.