राम गणेश गडकरींच्या पुतळ्यास आमचा कायम विरोध राहणार असे सांगत संभाजी उद्यानामध्ये संभाजी महाराजांच्या पुतळा बसविण्यात यावा, असे संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी सोमवारी पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितले.

मागील आठवड्यात संभाजी बागेतील राम गणेश गडकरींचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी काढला. या घटनेपूर्वी गडकरींचा पुतळा काढला जावा, यासाठी अनेक वेळा महापालिकेशी पत्रव्यवहार करून मागणी केली होती. याची दखल महापालिका प्रशासन आणि राजकीय नेत्यांनी घेतली नाही. यामुळे कार्यकर्त्यानी पुतळा काढला. गडकरींच्या पुतळया जागी संभाजी महाराजाचा पुतळा बसला पाहिजे. गडकरींच्या पुतळयास आणि तैलचित्रास कायम विरोध राहणार असल्याचे मिटकरी यांनी म्हटले. गडकरींचा पुतळा पुन्हा बसविण्यात यावा, अशी मागणी होत असताना संभाजी ब्रिगेडने आपली भूमिका मांडली.

आगमी महापालिका निवडणूक डोळयासमोर ठेवून गडकरीचा पुतळा काढण्यात आला नाही. मागील ७ वर्षांपासून पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र, त्याची दखल घेतली न गेल्याने अखेर कार्यकर्त्यानी गडकरीचा पुतळा काढला. पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत संभाजी ब्रिगेड सर्व ताकदीनिशी उतरणार असल्याचेही संघटनेचे नेते संतोष शिंदे यांनी सांगितले.

राम गणेश गडकरी यांचा संभाजी उद्यानात असलेला पुतळा मंगळवारी (३ जानेवारी) मध्यरात्री संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी काढून नदीपात्रामध्ये फेकून दिला होता.  वारंवार निवेदन देऊन देखील गडकरी यांचा पुतळा संभाजी उद्यानातून महापालिकेनी हलवला नाही त्यामुळे आम्ही स्वतःच गडकरींचा पुतळा काढून टाकला असे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी म्हटले होते. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले होते.

डेक्कन पोलिसांकडून प्रदीप भानुदास कणसे (वय २५, रा. नऱ्हे आंबेगाव), हर्षवर्धन महादेव मगदूम (वय २३, सध्या रा. बालाजीनगर, मूळ रा. हरीपूर, सांगली), स्वप्नील सूर्यकांत लाळे (वय २४, रा. वडमुखवाडी, चऱ्होली), गणेश देवीदास कारले (वय २६, रा. चांदूस, ता. खेड) यांना अटक करण्यात आली होती. या चार आरोपींना १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या चौघा आरोपींची पोलीस कोठडीत ठेवण्याची मुदत संपल्यानंतर त्यांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणात आणखी काहीजणांचा सहभाग असल्याचा संशय आहे. त्यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. त्यामुळे आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी विनंती सहायक सरकारी वकील अ‍ॅड. वामन कोळी यांनी न्यायालयाकडे केली. न्यायालयाने चौघा आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचे आदेश दिले.