पुण्याची पाऊणशे वर्षांपेक्षा अधिक काळ ओळख असलेल्या संभाजी उद्यानाला विविध बांधकाम व तत्सम ‘अतिक्रमणां’नी मोठय़ा प्रमाणात ग्रासले असून, या उद्यानाचे मूळचे ३५ हजार चौरस मीटर इतके असलेले क्षेत्र आता बरेच कमी झाले आहे. विशेष म्हणजे, ते नेमके किती कमी झाले याची माहितीही उद्यान अधीक्षक व तेथील अभियंत्यांकडे उपलब्ध नाही. सध्याही बागेत कुंपणासाठी बांधकाम सुरूच आहे.
शिवाजीनगरसारख्या मध्यवर्ती भागात हे उद्यान आहे. त्याची निर्मिती १९३८ साली झाली. पुण्यातील प्रमुख चारपाच 15Udyan2 उद्यानांमध्ये त्याचा समावेश होतो. उद्यानात वृक्ष, मोकळी जागा या गोष्टी आवश्यक असतात. मात्र, दिवसेंदिवस या उद्यानाचे क्षेत्र कमी-कमी होत गेले आहे. आता तर सर्वच बाजूंनी त्याला बांधकामे आणि अशा ‘अतिक्रमणां’चा विळखा पडला आहे. ही बांधकामे नेमक्या किती क्षेत्रावर झाली आहेत आणि आता उद्यान किती क्षेत्रावर उरले आहे, याची माहितीही उद्यान अधीक्षक तुकाराम जगताप आणि कनिष्ठ अभियंता खरात हे उपलब्ध करू शकले नाही.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्यानाचे मूळचे क्षेत्र ३५ हजार चौरस मीटर इतके होते. मात्र, रस्ता रुंदीकरण, आजूबाजूला उभी राहिलेली बांधकामे यांच्यासाठी किती क्षेत्र गेले आहे याची त्यांच्याकडे नोंद नाही. सध्या उपलब्ध असलेल्या उद्यानात ६३५ चौरस मीटर क्षेत्रावर बांधकाम अस्तित्वात आहे, तर आणखी ६५० चौरस मीटर क्षेत्रावर बांधकाम सुरू आहे किंवा नियोजित आहे.
या उद्यानाच्या मूळच्या क्षेत्रातूनच बालगंधर्व रंगमंदिर, बालगंधर्वचा वाहनतळ, जलतरण तलाव, तलावाजवळील इमारत, बालगंधर्व पोलीस चौकी, झाशीच्या राणीचा पुतळा यांना जागा देण्यात आली आहे. या शिवाय दोन्ही बाजूंच्या रस्त्यांच्या रुंदीकरणासाठीही उद्यानाचीच जागा गेली आहे. या गोष्टींशिवाय बागेच्या क्षेत्रातच महापालिकेची आरोग्यकोठी, सुलभ शौचालय, महापालिकेचे सुविधा केंद्र, रोपवाटिका विभागातील अनेक खोल्या, सध्या गाजत असलेला पार्किंग टॉवर ही बांधकामे उभारण्यात आली आहेत. भेळ-पाणीपुरी गाडय़ांनीही मोठी जागा व्यापली आहे. याशिवाय गेल्या काही वर्षांत बागेतील तलाव, लक्ष्मीची मूर्ती हे पाडून तेथे प्रशासकीय इमारतीचे काम सुरू आहे.
याशिवाय मुख्य (मधल्या) प्रवेशद्वारसमोर असलेल्या चौकोनी तलावाजवळ ‘बँड स्टँड’ होते. त्या जागेवर प्रशासकीय इमारत उभारण्यात आली आहे. याशिवाय अंतर्गत रस्ते, कार्यालयाजवळची शहराची प्रतिकृती (किल्ला), राम गणेश गडकरी पुतळा, सिमेंटचे तीन पॅगोडा, पाणपोई अशी बांधकामेसुद्धा बागेत आहेत. यापैकी काही गरजेची आहेत. मात्र, सुशोभीकरणाच्या नावाखाली काही बांधकामांनी बागेची मोकळी जागा व वृक्षांवर अतिक्रमण केले आहे.
संभाजी उद्यानाच्या मूळ क्षेत्रावर सध्या असलेली बांधकामे व इतर गोष्टी –
– लक्ष्मीची मूर्ती व तलाव हलवून तेथे प्रशासकीय इमारतीचे काम सुरू
– बालगंधर्व रंगमंदिर
– बालगंधर्व रंगमंदिराचा वाहनतळ
– जलतरण तलाव
– तलावाजवळील इमारत
– बालगंधर्व पोलीस चौकी
– रणगाडा
– मुख्य (मधल्या) प्रवेशद्वारासमोर असलेल्या तलावाजवळ ‘बँड स्टँड’ येथे प्रशासकीय इमारत
– रस्त्यासाठी गेलेली जागा (अंतर्गत)
– कार्यालयाजवळची शहराची प्रतिकृती (किल्ला)
– राम गणेश गडकरी पुतळा
– झाशीच्या राणीचा पुतळा
– जंगली महाराज रस्त्याच्या रुंदीकरणासाठी गेलेली जागा
– सिमेंटचे तीन पॅगोडा
– पाणपोई
– भेळ-पाणीपुरी गाडय़ांची जागा
– महापालिकेची आरोग्यकोठी
– सुलभ शौचालय
– महापालिकेचे सुविधा केंद्र
– रोपवाटिका विभागात अनेक खोल्या बांधल्या आहेत
– सध्या गाजत असलेला पार्किंग टॉवर
– यात भर म्हणून सध्या कुंपणाच्या भिंतीचे बांधकाम सुरू

‘‘संभाजी बागेत सध्या उद्यान विभागाचे कार्यालय व भिंतीच्या बळकटीकरण काम सुरू आहे. आम्ही मास्टर प्लॅननुसार बागेचे सुशोभीकरण करत आहोत. बागेचे क्षेत्र नेमके किती कमी झाले याची माहिती नाही. मात्र, येथील झाडे कमी झालेली नाहीत.’’
तुकाराम जगताप, उद्यान अधीक्षक