मीटर काढून टाकण्यात व्यावसायिक आघाडीवर; यापुढे पोलीस संरक्षणात कार्यवाही

सर्वाना समन्यायी पद्धतीने पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महापालिकेने हाती घेतलेल्या महत्त्वाकांक्षी समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत निवासी आणि व्यावसायिक मिळकतींना पाण्याचे मीटर बसविण्याचे काम संथगतीने सुरू असतानाच जे मीटर बसविण्यात आले आहेत, ते काढून टाकण्यात व्यावसायिक ‘आघाडी’वर असल्याचे चित्र पुढे आले आहे.

महापालिकेने ठेकेदाराकडून बसविलेले पाण्याचे तीनशे मीटर काढून टाकण्यात आले असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली. यामध्ये व्यावसायिकांची संख्या मोठी असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता पोलीस बंदोबस्तामध्ये पुन्हा पाणी मीटर बसविण्यात येणार आहेत.

शहराची भौगोलिक परिस्थिती, पाणी वितरणातील त्रुटी, अपुरा, अनियमित आणि विस्कळीत पाणीपुरवठा या पाश्र्वभूमीवर समन्यायी पद्धतीने पाणी वाटप करण्यासाठी समान पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आली आहे. जलवाहिन्या टाकणे, साठवणूक टाक्यांची उभारणी आणि पाण्याचे मीटर बसविणे अशा तीन टप्प्यात या योजनेतील कामे समांतर पद्धतीने सुरू करण्यात आली आहेत. त्यासाठी निविदा प्रक्रियाही राबविण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत शहरातील ४ लाख १७ हजार मिळकतींमध्ये पाण्याचे मीटर बसविण्याचे नियोजन आहे. त्यानुसार साडेतीन हजार मीटर निवासी आणि व्यावसायिक मिळकतींमध्ये बसविण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात कळस, धानोरी, लोहगांव, विमाननगर, खराडी, कात्रज आणि वडगाव बुद्रुक आदी भागात एकूण १२ हजार मीटर बसविण्यात येणार आहेत. त्यापैकी कळस, धानोरी, वडगांवशेरी, विमाननगर या परिसरात एकूण ७ हजार मीटर बसिवण्यात येणार आहेत, मात्र येथील नागरिकांनी मीटर बसविण्यास विरोध केला आहे. त्यामुळे सात हजारापैकी अवघे तीनशे मीटर बसविण्यात आले असले तरी त्यातील अनेक मीटर व्यावसायिकांनी काढून टाकले आहेत, असे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते.

तीनशे मिळकतींमधील पाण्याचे मीटर काढून टाकण्यात आले आहेत. काही ठिकाणी नगरसेवकांच्या दबावामुळे पाणी मीटर बसविण्यात अडथळे निर्माण होत आहेत. तसेच जलवाहिन्यांची कामे करण्यासाठी रस्ते खोदाई नको, अशी भूमिकाही नगरसेवकांनी घेतली आहे. त्यामुळे आता पोलीस बंदोबस्तामध्ये हे काम करण्यात येणार आहे.

तीन टप्प्यात कामे

समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत एक हजार ६०० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या नव्याने टाकण्यात येणार आहेत. तर जुन्या-जीर्ण जलवाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. सध्या शंभर किलोमीटर लांबीच्या अंतरात जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत.  ८२ ठिकाणी साठवणूक टाक्यांची उभारणी करण्यात येणार आहे. त्यापैकी २६ टाक्यांचे काम पूर्ण झाले असून १२ टाक्यांची कामे निम्मी झाली आहेत. काही टाक्यांसाठी भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

ठोस धोरण प्रस्तावित

पाण्याचे मीटर काढून टाकणे, अनधिकृत नळजोड घेणे, मीटर बसविण्यास विरोध होणे, अशा परिस्थितीत ठोस धोरण हाती घेतले जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी विरोध करणाऱ्यांना किंवा पाण्याचे मीटर काढून टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करता येऊ शकते का, याची चर्चा सुरू झाली आहे. त्यानुसार धोरण तयार करण्यात येणार आहे. हे धोरण महापालिका नियमावलीतील तरतुदीनुसारच करण्यात येणार आहे. त्यासाठी जबर दंड आकारणी प्रस्तावित असेल. स्थायी समिती आणि मुख्य सभेच्या मान्यतेनंतरच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सध्या पोलीस बंदोबस्तामध्ये पाणी मीटर बसविण्यात येतील, असे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले.