समन्यायी पद्धतीने पाणी देण्यासाठी महापालिकेने हाती घेतलेल्या समान पाणीपुरवठा योजनेतील कामे रखडली असल्याचे पुढे आले आहे. यापूर्वी जलवाहिनी टाकण्याच्या कामांचा वेग अपेक्षित नसल्यामुळे संबंधित कंपन्यांना नोटिसा बजाविण्यात आल्यानंतर आता घरोघरी पाण्याचे मीटर बसविण्यातही दिरंगाई झाली आहे. महापालिकेकडे चाळीस हजार मीटर उपलब्ध असताना केवळ पन्नास मीटर बसविण्यात आल्यामुळे महापालिका आयुक्तांनीच योजनेच्या गतीबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरात विविध कामे करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात एक हजार ६०० किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकणे, साठवणूक टाक्यांची उभारणी आणि पाण्याचे मीटर बसविण्यात येणार आहेत. जलवाहिनी टाकण्याच्या कामांसाठी एल अ‍ॅण्ड टी आणि जैन इरिगेशन या कंपन्यांना काम देण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात या दोन्ही कंपन्यांकडून १५० किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्याची कामे होणे अपेक्षित होते. मात्र महापलिकेने केलेल्या पाहणीत ही कामे जेमतेम ५० किलोमीटर पर्यंत झाल्याचे पुढे आले. साठवणूक टाक्या उभारणीसाठीही भूसंपादन करणे प्रशासनाल जिकिरीचे ठरत आहे. त्यातच आता पाण्याचे मीटर बसविण्याचे कामही संथगतीने सुरू असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे आयुक्तांनीच या कामांबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू केल्यानंतर महापालिकेने व्यावसायिक मिळकतींना पाणी मीटर बसविण्यास सुरुवात केली. मात्र काही पाणीमीटर बसविण्यात आल्यानंतर मीटर पुरविणाऱ्या कंपनीने चुकीच्या पद्धतीने ते बसविल्याचे पुढे आले होते. त्यामुळे पुन्हा नव्याने काम सुरू करण्यात आले आहे. मात्र महिन्याभरात केवळ ५० मीटर बसविण्यात आल्याचे पुढे आले. या महत्त्वाकांक्षी योजनेची कामे संथगतीने सुरू राहिल्यास योजना मुदतीमध्ये कशी पूर्ण होईल, अशी विचारणा करत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

योजनेच्या कामात अनेक अडथळे

शहराची भौगोलिक परिस्थिती, पाणी वितरणातील त्रुटी आणि गळती, वितरणात असमानता असल्यामुळे या योजनेला मान्यता देण्यात आली आहे. मात्र योजनेच्या कामात अनेक अडथळे येत आहेत. साठवणूक टाक्यांची उभारणी करण्यासाठी भूसंपादनाचा मोठा अडसर आहे. सदोष काम, जलवाहिनी टाकण्याच्या कामांना मिळत नसलेली मंजुरी यामुळे कामे रखडत आहेत. मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्यानंतर प्रशासनाकडून साडेतीनशे मीटर चुकीच्या पद्धतीने बसविण्यात आले होते. त्यामुळे आता ही योजना कशी पुढे सरकणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुख्य सभेच्या मान्यतेनंतरच दराची आकारणी

शहराला अखंड चोवीस तास पाणीपुरवठा समन्यायी पद्धतीने उपलब्ध व्हावा, यासाठी महापालिकेने समान पाणीपुरवठा योजनेला मान्यता दिली आहे. ही योजना २ हजार ६०० कोटींची असून तीन टप्प्यात योजनेची कामे होणार आहेत. त्यासाठी पाण्याचे दरही निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्या एक हजार लिटरसाठी सात रुपये असा दर राहणार आहे. महापालिकेच्या मुख्य सभेच्या मान्यतेनंतरच दराची आकारणी होणार आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.