News Flash

‘सामना’ची चाळिशी

डॉ. श्रीराम लागू आणि निळू फुले यांच्या अभिनय जुगलबंदीने रंगलेल्या ‘सामना’ चित्रपटाने चाळिशी पूर्ण केली आहे. कलासंस्कृती परिवारने शनिवारी ‘सामना : नाबाद ४०’ या आगळ्यावेगळ्या

| April 18, 2015 03:11 am

‘मारुती कांबळेचं काय झालं?’ असा प्रश्न विचारणारे मास्तर.. ‘कुणी तरी अशी पटापट गंमत आम्हा सांगील काय’, ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ ही गीते.. विजय तेंडुलकर यांचे कथा-पटकथालेखन.. डॉ. जब्बार पटेल यांचे चित्रपटातील दिग्दर्शकीय कारकिर्दीतील पदार्पण.. डॉ. श्रीराम लागू आणि निळू फुले यांच्या अभिनय जुगलबंदीने रंगलेल्या ‘सामना’ चित्रपटाने चाळिशी पूर्ण केली आहे. हे औचित्य साधून कलासंस्कृती परिवारने शनिवारी (१८ एप्रिल) ‘सामना : नाबाद ४०’ या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मजल मारत ‘सामना’ने जागतिक चित्रपटांमध्ये आपले स्थान तर निर्माण केलेच; पण त्यापेक्षाही भारतीय चित्रपट इतिहासामध्ये मराठीची मुद्रा ठळक केली. ज्या राजकीय-सामाजिक परिस्थितीचे ‘सामना’ने भेदकपणे चित्रण केले ते वास्तव आजही कायम आहे. या दृष्टिकोनातून ‘सामना’चे पुनरावलोकन करण्याच्या उद्देशातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. जब्बार पटेल, डॉ. श्रीराम लागू, पाश्र्वगायक रवींद्र साठे आणि निर्माते-वात्रटिकाकार रामदास फुटाणे ही मंडळी अनौपचारिक गप्पांतून ‘सामना’च्या निर्मितीमागच्या आठवणींबरोबरच या चित्रपटाचे समकालीनत्व उलगडणार आहेत. ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक समर नखाते, राजकारणाचे साक्षीदार असलेले माजी आमदार उल्हास पवार, ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ या वेळी उपस्थित राहणार आहेत. घोले रस्त्यावरील जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक केंद्र येथे सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात ‘सामना’ चित्रपटातील अविस्मरणीय प्रसंग आणि गाणीही रसिकांना पडद्यावर पाहता येणार आहेत. त्याचप्रमाणे चित्रपट निर्मितीमध्ये सहभागी असलेल्या कलावंत-तंत्रज्ञांनाही आवर्जून निमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती मेघराजराजे भोसले आणि वैभव जोशी यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2015 3:11 am

Web Title: samna movie completes fourty years
Next Stories
1 संस्कृती संवर्धनासाठी राज्य सरकारचा ‘कलांगण’ उपक्रम
2 किडनी विकारावर योगोपचार ठरला प्रभावी
3 ‘सोमेश्वर’मध्ये राष्ट्रवादी पॅनेलची एकहाती सत्तेच्या दिशेने वाटचाल
Just Now!
X