देशातील भाषिक वैविध्य ही जितकी अभिमानाची बाब आहे, तितकीच ती समस्याही आहे. त्यामुळे एका भाषेतील श्रेष्ठ साहित्यकृतींपासून दुसरे भाषक वंचित राहतात. विविध भाषांमधील साहित्याच्या देवाणघेवाणीतूनच आपण ‘भाषिक वाङ्मया’कडून ‘भारतीय वाङ्मया’कडे जाऊ शकू, असा सूर विविध भाषांमधील ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त लेखकांनी व्यक्त केला.
एकोणनव्वदाव्या अखिल भारतील मराठी साहित्य संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी संस्कृत भाषेतील ज्येष्ठ साहित्यिक सत्यव्रत शास्त्री, ज्येष्ठ काश्मिरी साहित्यिक रहमान राही आणि ज्येष्ठ उडिया साहित्यिक प्रतिभा राय व सीताकांत महापात्रा यांच्याशी या वेळी मंगला खाडिलकर यांनी संवाद साधला. शास्त्री यांच्या संस्कृत कविता, राही यांचे फारसी व काश्मिरी बोल आणि राय यांच्या ‘याज्ञसेनी’ या गाजलेल्या उडिया कादंबरीतील उतारा असे भाषावैविध्य रसिकांनी अनुभवले.
‘संस्कृतला देवभाषा म्हणतात, परंतु एक हजार वर्षांपर्यंत संस्कृत ही लोकभाषा होती. जाती वा वर्णाशी तिचा संबंध नव्हता. प्रत्येक जातीच्या व वर्णाच्या लोकांनी संस्कृतमध्ये योगदान दिले आहे,’ असे सांगून शास्त्री म्हणाले,‘प्रत्येक भाषेतील श्रेष्ठ साहित्याचे इतर भाषांमध्ये अनुवादन व्हायला हवे. विद्यापीठांमध्ये भाषांतर कार्यालये सुरू करून त्यामार्फत हे काम करता येईल. या आदानप्रदानाचा आपल्याला एकमेकांना समजून घ्यायला उपयोग होईल आणि खऱ्या अर्थाने ‘भारतीय वाङ्मया’ची रचना होऊ शकेल.’
राही म्हणाले,‘सकाळी उठल्यावर फुलांचा सुगंध असतो आणि नंतर दारुगोळ्याचा दरुगध असे चित्र काश्मीरमध्ये आजही आहे. काश्मिरी भाषा खूप जुनी असून अनेक पातळ्यांवर तिच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, परंतु आज काश्मिरी लोक त्यांच्या भाषेबद्दल जागरूक झाले आहेत. विविध भाषांमधील साहित्याच्या देवाणघेवाणीने आपण एकत्र येऊ शकतो.’
राय म्हणाल्या,‘प्रत्येक भाषा महत्त्वाचीच असते. किती लोक ती भाषा बोलतात यावर तिचे मोठेपण अवलंबून नाही. माझी ‘याज्ञसेनी’ ही कादंबरी संस्कृतमध्येही उपलब्ध आहे, तर वि. स. खांडेकरांच्या ‘ययाती’ने मी प्रभावित झाले.’
प्रत्येक भाषेला तिचा इतिहास असून भाषांच्या व्युत्पत्तीबद्दल मतभेद नकोत, असे सांगून महापात्रा म्हणाले,‘भाषातज्ज्ञांनी भाषांचे गटांमध्ये विभाजन केले आहे. देशातील भाषांच्या वैविध्याचा आपल्याला अभिमान असायला हवा, पण त्याच वेळी एका भाषेतील श्रेष्ठ साहित्याला इतर भाषक मुकत असल्यामुळे ती समस्याही ठरते. वाचक एकाच भाषेपुरता मर्यादित राहायला नको. एका भाषेतील साहित्याचा दुसऱ्या भाषेत अनुवाद गरजेचा आहे.’