धर्मचिकित्सा केल्याशिवाय माणूस धार्मिक अंधश्रद्धेतून मुक्त होणार नाही. तुकाराम, कबीर, मीरा या संतांनी मानव कल्याणाचा मार्ग सांगताना अंधश्रद्धेवर कडाडून प्रहार केले. मात्र, त्यांच्या या विद्रोहाकडे दुर्लक्ष करून सर्व संतांचे ब्राह्मणीकरण केले गेले, अशी टीका ज्येष्ठ विचारवंत आणि पाचव्या सम्यक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांनी शुक्रवारी केली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे आयोजित पाचव्या सम्यक साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ दिग्दर्शक महेश भट यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी अध्यक्षीय भाषणात कसबे बोलत होते. ज्येष्ठ ऊर्दू अभ्यासक प्रा. जहीर अली, मावळत्या संमेलनाध्यक्षा नीरजा, अिजक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु एकनाथ खेडेकर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष परशुराम वाडेकर, डॉ. विजय खरे आणि व्ही. जी. रामटेके या वेळी उपस्थित होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांचे संमेलनाला सहकार्य लाभले आहे.
धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्वधर्मसमभाव असा चुकीचा अर्थ लावला गेला. माझ्या जगण्यातील व्यावहारिक आणि ऐहिक प्रश्नांना धर्माशी संबंध न जोडणे म्हणजे धर्मनिरपेक्षता असे सांगून कसबे म्हणाले,की देशामध्ये खऱ्या प्रश्नांसाठी संघर्ष होत नाही. बनावट प्रश्नांमध्ये लोकांना गुंतवून ठेवायचे आणि राज्य करायचे हीच राज्यकर्त्यांची नीती राहिली आहे. नव्या पिढीच्या मुलांना लिहिते करण्यासाठी आणि त्यांना व्यासपीठ देण्याच्या उद्देशातून दलित, ग्रामीण, आदिवासी साहित्य चळवळी आणि संमेलने हा प्रवाह आला. मात्र, सध्याचे साहित्यिक स्वत:च्या मोठेपणाच्या टिमक्या वाजविण्यात मश्गूल असून काहीजण जगाशी संबंध ठेवू इच्छित नाहीत. मराठी साहित्यात वैचारिक लेखनाचा ठणठणाट असून टीकाकार आणि समीक्षक हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच उरले आहेत. समीक्षा समृद्ध असलेल्या भाषेतील साहित्यही सर्जनशील असते. दोन लाख पगार घेणारे प्राध्यापक करतात काय, असा प्रश्न उपस्थित होतो.
प्रा. जहीर अली म्हणाले,‘‘ गालिब आज असता तर त्याचे डोके फोडले गेले असते. लेखकांना घाबरणारे राज्यकर्ते धर्म, देश, सुरक्षेच्या नावाखाली पुस्तकांवर आणि चित्रपटांवर बंदी आणतात. बुद्धिप्रामाण्यवादाच्या विरोधात चळवळ उभी केली जात आहे. केवळ हिंदूूंमध्येच नाही, तर मुस्लिमांमध्येही कट्टरतावाद वाढत आहे. माणसाला माणूसपण देण्याचे काम साहित्य करते.’’
‘‘सध्या अभिव्यक्तीला मारक परिस्थिती असून शब्दांवर बंदूक रोखून बसलेले संस्कृतीरक्षक बाजूला असताना आम्ही लेखक-कवी नेटाने लिहित आहोत. एरवी सरकार पाठीशी उभे राहिल्याचा देखावा करते. पण, आता सरकारच अशा गोष्टींना पाठिंबा देते तेव्हा सारेच अवघड होते,’’ असे नीरजा यांनी सांगितले. वाडेकर यांनी प्रास्ताविक केले. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले.
चित्रपट प्रदर्शन रोखणे सोपे
‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘दिलवाले’ या चित्रपटांसंदर्भात होत असलेल्या वादाबाबत महेश भट यांनी चित्रपटाचे प्रदर्शन रोखणे सोपे असते, असे भाष्य केले. निर्माता-दिग्दर्शकाचे सारे आयुष्य पणाला लागलेले असते. चित्रपटांना विरोध करून कमी खर्चात सर्वाधिक परिणाम साधता येतो. समोरचा माणूस चुकीचे बोलत असला तरी त्याला बोलण्याची संधी दिली पाहिजे हे सभ्यतेचे आणि सहिष्णूतेचे लक्षण आपण विसरतो आहोत, याकडेही भट यांनी लक्ष वेधले. हा स्वतंत्र विचारांचा पुरस्कार करणारा देश आहे. एकदा सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र दिल्यानंतर ज्यांचे आक्षेप असतील त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा. तोडफोड, िहसाचार करून काहीच साध्य होत नाही, असेही भट यांनी सांगितले.