डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला तीन वर्षे पूर्ण होऊनही मारेकरी अद्याप मोकाट असल्याच्या निषेधार्थ अंधश्रद्धा निमुर्लन समितीने (अंनिस) पुण्यात शनिवारी सकाळी मोर्चा काढला. तर दुसरीकडे पुरोगामी संघटना या सनातन संस्थेची बदनामी करत असल्याच्या निषेधार्थ सनातन संस्थेनेही मोर्चा काढला. अंनिस व इतर पुरोगामी संघटना या सनातन संस्थेची बदनामी करत असल्याचा आरोप सनातनचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी या वेळी केले.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला शनिवारी तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त अंनिसच्या वतीने ओंकारेश्वर पुलापासून निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हत्येला तीन वर्ष पुर्ण होऊन देखील तपासाची चक्रे अजूनही संथगतीने फिरत असल्याचे मुक्ता दाभोलकर व डॉ. हामिद दाभोलकर यांनी या वेळी माध्यमांशी बोलताना सांगितले. अंनिसच्या निषेध मोर्चात भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर, बाबा आढाव, अतुल पेठे, संध्या गोखले आदी सहभागी झाले होते.
सनातन संस्थेने अंनिस व इतर पुरोगामी संघटना या सनातन संस्थेची बदनामी करत असल्याच्या निषेधार्थ पुण्यातील महाराणा प्रताप उद्यान ते कसबा गणपपतीपर्यंत मोर्चा काढला. या मोर्चामध्ये कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा, वीरेंद्र तावडे आणि कमलेश तिवारी यांच्या समर्थनात फलक घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले होते. या वेळी ‘आम्ही सारे दाभोलकर’ प्रमाणे ‘आम्ही सारे सनातन’च्या घोषणाही देण्यात आल्या.
डॉ. दाभोलकर व गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातनचे पोलीसांना सहकार्याचे धोरण आहे. परंतु त्यांनी विनाकारण संस्थेला धारेवर धरू नये. तसेच पुरोगामी संघटनांकडून होत असलेली बदनामी त्वरीत बंद करावी. उलट सरकारने डॉ. दाभोलकर यांच्या संस्थेला देशातून व विदेशातून जो निधी येतो त्याची चौकशी करावी, अशी मागणी अभय वर्तक यांनी केली. ७२ दिवस झाले वीरेंद्र तावडे यांना अटक करून पण त्यांच्याविरोधात एकही पुरावा अद्याप पोलिसांना देता आलेला नसल्याचेही त्यांनी या वेळी म्हटले.