पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. १५ डिसेंबरला पिंपळे सौदागर परिसरात १० जणांच्या टोळक्याने शत्रुघ्न पालमपल्ले या तरुणाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता. कोयते आणि काठ्यांनी करण्यात आलेल्या मारहाणीत शत्रुघ्न गंभीर जखमी झाला होता. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. आतापर्यंत पोलिसांनी या हल्ल्यातील तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,१५ डिसेंबरला रात्री ८ च्या सुमारास मोबाइल दुसरुस्त करण्यासाठी जात असताना अचानक १० जणांच्या टोळक्याने शत्रुघ्नवर हल्ला चढवला होता. जीव वाचवण्यासाठी तो रस्त्यावर सैरावैरा पळत होता. मात्र, कोणीही त्यांच्या मदतीला पुढे आले नाही. अखेर टोळक्याने त्यांना गाठून धारदार शस्त्रे आणि लाथा-बुक्यांनी शत्रुघ्नला मारहाण केली. हा सर्व प्रकार जवळच्या वसाहतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. यावरून पोलिसांनी हल्लेखोरांचा माग काढण्यास सुरूवात केली होती. मात्र, या हल्ल्यातील मुख्य सूत्रधार अजूनही मोकाटच आहे. हा हल्ला पूर्ववैमन्यसातून झाल्याची शक्यता पोलिसांनी यापूर्वीच वर्तवली होती. सध्या विक्की संगमे,आशिष तांगडे आणि रोहित नागटिळक हे तिघेजण पोलिसांच्या ताब्यात आहेत. उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.