‘समाजबंध’ स्वयंसेवी संस्थेचा उपक्रम

मासिक पाळीच्या काळात वापरला जाणारा सॅनिटरी नॅपकिन हा शहरातील सुशिक्षित महिलांसाठी दिलासादायक भाग असला तरी ग्रामीण आणि आदिवासी महिलांसाठी आजही सॅनिटरी नॅपकिनची सुविधा पोहोचलेली नाही. त्यातून आरोग्याच्या अनेक तक्रारींना सामोऱ्या जाणाऱ्या या महिलांच्या समस्येची दुखरी बाजू ओळखून त्यावर उत्तर शोधण्याचे काम पुण्यातील ‘समाजबंध’ या संस्थेने केले आहे.

ग्रामीण आणि आदिवासी भागातील महिलांसाठी मासिक पाळीच्या काळात वापरण्याजोगे, कापडाच्या पुनर्वापरातून बनवलेले सॅनिटरी नॅपकिन मोफत उपलब्ध करून देण्याचा उपक्रम समाजबंधतर्फे हाती घेण्यात आला आहे. सचिन आशा सुभाष या कायद्याचे शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणाने या उपक्रमाबाबत माहिती दिली. कायद्याचे शिक्षण घेताना काही सामाजिक कामही करता यावे या विचारातून एकत्र आलेल्या तरुण-तरुणींच्या पुढाकारातून हा उपक्रम सुरू झाला. ग्रामीण भागातील महिलांमध्ये मासिक पाळीची साधने उपलब्ध नसल्याने आरोग्याच्या अनेक तक्रारी आहेत. हे लक्षात आल्याने त्यांना देण्यासाठी सॅनिटरी नॅपकिन निर्मितीचे काम सुरू करण्यात आले. त्यातूनच कापडापासून बनवलेले उत्तम दर्जाचे सॅनिटरी नॅपकिन बनवले असता त्याचा या महिलांना उपयोग होऊ शकेल, तसेच पुनर्वापरही करता येईल अशा विचारातून हा उपक्रम सुरू झाला.

सचिन म्हणाला,की बाजारातील तयार सॅनिटरी नॅपकिन प्लास्टिक वापरुन केलेले असल्याने ते महाग असतात. त्यांचा पुनर्वापर करता येत नाही. त्यांची संपूर्ण विल्हेवाट लावण्याची सोय नसल्याने ते पर्यावरणासाठी घातक आहेत. त्यामुळे या सगळ्या समस्यांवर उपाय ठरेल असा नॅपकिन तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केला. शहरातील नागरिकांनी वापरलेले, चांगल्या स्वरुपातील कपडे गोळा करून त्यांचा वापर सॅनिटरी नॅपकिन निर्मितीसाठी करण्याचा निर्णय आम्ही घेतला. चांगले कपडे देण्याची मागणी केली तेव्हा उदंड प्रतिसाद मिळाला आणि त्यातून प्रेरणा मिळाली. एकावर एक वीस थरांच्या या सॅनिटरी नॅपकिनमुळे महिलांना मासिक पाळीच्या काळात पुरेसे संरक्षण मिळेल. त्याचा आकार रुमालासारखा ठेवल्यामुळे महिला न लाजता हे नॅपकिन धुवून उन्हात वाळवू शकतील. हे नॅपकिन तयार करण्याचे प्रशिक्षण शहरातील गरजू महिलांना दिले. सध्या महिन्याला चार हजार सॅनिटरी नॅपकिन तयार करुन ते आदिवासी महिलांपर्यंत पोहोचवले जात आहेत. हे नॅपकिन देताना त्यांना त्याच्या वापराबद्दल माहिती देण्याबरोबरच असे नॅपकिन तयार करण्याचे प्रशिक्षणही दिले जाते. त्यामुळे आर्थिकदृष्टय़ा दुर्बल गटातील महिलांना सक्षम करणे आणि आरोग्याच्या समस्या असलेल्या महिलांना सॅनिटरी नॅपकिनचा निरोगी पर्याय देणे अशा दोन्ही गोष्टी साध्य होत आहेत.

जुने कपडे द्यायचे असल्यास..

‘समाजबंध’ संस्था वापरून जुने झालेले मात्र चांगल्या स्थितीत असलेले कपडे घेऊन त्यापासून सॅनिटरी नॅपकिन तयार करते. ‘समाजबंध’शी संपर्क साधण्यासाठी ७७०९४८८२८६ या क्रमांकावर किंवा sachinashasubhash@gmail.com  या पत्त्यावर ईमेल पाठवण्याचे आवाहन ‘समाजबंध’कडून करण्यात आले आहे.

‘समाजबंध’ संस्थेतर्फे गरजू महिलांना कापडापासून सॅनिटरी नॅपकिन निर्मितीचे प्रशिक्षण दिले जाते, तसेच तयार नॅपकिन ग्रामीण आणि आदिवासी महिलांना विनामूल्य दिले जातात.