News Flash

ब्रिटिश कॅम्पकडून कोकणातील रुग्णसेवेचा वसा

डॉ. संजय देशपांडे यांचा उपक्रम

डॉ. संजय देशपांडे यांचा उपक्रम

कोकणातील डेरवण येथील बी. के. वालावलकर रुग्णालय. जानेवारी महिन्यातील शेवटच्या आठवडय़ात या रुग्णालयात ब्रिटिश डॉक्टर आणि परिचारिकांची वर्दळ सुरू होते. वर्षांतले सहा दिवस ब्रिटिश डॉक्टर आणि परिचारिकांचा चमू डेरवण इथे आपला तंबू ठोकतो आणि येथील गरजू रुग्णांवर मोफत औषधोपचार आणि शस्त्रक्रिया केल्या जातात! मॉडर्न नर्सिगचा पाया घालणाऱ्या फ्लॉरेन्स नाईटिंगेल हिची गोष्ट प्रत्येकाने कधी तरी ऐकलेली असते. डेरवण येथे येणारा हा ब्रिटिश कॅम्प तिच्याच रुग्णसेवेचा वसा गेली १३ वर्षे डेरवणमध्ये चालवत आहे. या ब्रिटिश कॅम्पच्या पाठीशी आहे लंडनस्थित एक मराठी नाव- डॉ. संजय देशपांडे!

गेल्या १३ वर्षांमध्ये डेरवण येथे सुमारे २५०० मोफत शस्त्रक्रिया करण्याच्या कामाची नोंद डॉ. देशपांडे आणि त्यांच्या ब्रिटिश सहकाऱ्यांच्या नावावर झाली आहे. डॉ. देशपांडे मूळचे महाराष्ट्रातील. औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी एम. बी. बी. एस. चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तीन वर्षे मुंबई येथे रुग्णसेवा करीत असतानाच त्यांना सौदी अरेबिया येथे नोकरी निमित्त जाण्याची संधी मिळाली. रुग्णसेवेनिमित्त सुरू झालेला डॉ. देशपांडे यांचा हा प्रवास १९९० मध्ये लंडन येथे स्थिरावला. दरम्यानच्या काळात त्यांनी भूलतज्ञ आणि इन्टेन्सिव केअर तज्ञ म्हणून नावलौकिक मिळविला. लंडन येथील वास्तव्यात ब्रिटिश कॅम्पची कल्पना रुजण्यास सुरुवात झाल्याचे डॉ. देशपांडे यांनी सांगितले.

ते म्हणाले, लंडन येथे स्थायिक होताच तेथील नॅशनल हेल्थ सर्विसमध्ये काम करण्यास सुरुवात केली. लंडन येथे कामानिमित्त वास्तव्य असले तरी भारतात आल्यानंतर डेरवण येथील बी. के. वालावलकर रुग्णालयात मी नियमित जात असे. तेथील सकारात्मक आध्यात्मिक वातावरण आणि मनोभावे केली जाणारी रुग्णसेवा यामुळे तेथे गेल्याशिवाय भारत दौरा पूर्ण होत नसे. डेरवणच्या या भेटीत तेथील रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यास मी सुरुवात केली. लंडन येथील सहकारी डॉक्टर आणि परिचारिकांना याबद्दल समजताच त्यांनीही डेरवण येथे रुग्णसेवेसाठी येण्याचा विचार व्यक्त केला. अशा तऱ्हेने दरवर्षी ब्रिटिश डॉक्टर आणि परिचारिकांना घेऊन मी डेरवण येथे येण्यास सुरुवात केली. गेली १३ वर्षे हा उपक्रम सुरू आहे. या काळात हृदयरोग, नेत्ररोग, त्वचारोग, अस्थीरोग अशा विविध प्रकारच्या सुमारे अडीच हजार मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ब्रिटिश संस्कृतीत रुग्णसेवेला अत्यंत महत्त्व आहे. रुग्णांना सर्वोत्तम सेवा, तीही मोफत मिळायला हवी ही ब्रिटिशांची आजही भावना आहे. त्याच भावनेतून भारतात स्वखर्चाने येणे, येथील रुग्णांवर आवश्यक त्या शस्त्रक्रिया आणि औषधोपचार विनामूल्य करणे या गोष्टी ते करतात. दरवर्षी ६ दिवस हा कॅम्प चालतो. या कॅम्पला येण्यासाठी डॉक्टर आणि परिचारिका तर वेटिंग लिस्टवर असतातच, पण डेरवण येथील रुग्णही या ब्रिटिश कॅम्पची वाट पाहतात असेही डॉ. देशपांडे यांनी आवर्जून सांगितले.

डॉ. देशपांडे म्हणाले, वैद्यकशास्त्रात आपल्या देशाने अभूतपूर्व प्रगती केली आहे. ब्रिटिश डॉक्टरांसह येथे येतो तेव्हा भारत वैद्यकशास्त्रात मागे नाही याचाच प्रत्यय येतो. त्यामुळे येथे आल्यावर अनेक गोष्टी शिकून परत जात असल्याची भावना ब्रिटिश डॉक्टर्स व्यक्त करतात. मात्र येथील वैद्यकसेवा अधिकाधिक रुग्णकेंद्री होण्याची गरज आहे.

आपल्या समाजात डॉक्टरला देव म्हटले जाते. मात्र बदलत्या काळाबरोबर रुग्णसेवेचेही व्यावसायिकरण होत चाललेले पाहायला मिळते. अशा वेळी डॉक्टर देशपांडे आणि त्यांच्या ब्रिटिश कॅम्पचे उदाहरण डॉक्टरांसाठी आदर्शवत आणि रुग्णांसाठी दिलासादायक असेच आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2018 2:48 am

Web Title: sanjay deshpande social work in pune
Next Stories
1 नोंदणी विभागात नव्या सव्‍‌र्हरचा विषय गुंडाळला
2 ज्येष्ठ नाटय़समीक्षक, लेखिका डॉ. मनीषा दीक्षित यांचे निधन
3 डी. एस. कुलकर्णी आणि हेमंती कुलकर्णी यांना २३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी
Just Now!
X