‘टाडा’ खाली शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्तला येरवडा कारागृहात वृत्रपत्रांच्या कागदापासून पिशव्या तयार करण्याचे काम देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या कामासाठी त्याला दिवसाला पंचवीस रुपये रोजगार मिळणार आहे. या कामाला रविवारपासून सुरुवात करणार आहे.
मुंबई येथे १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटाच्या वेळी शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला शिक्षा सुनावल्यानंतर त्याला येरवडा कारागृहात आणण्यात आले. त्याला कोणते काम दिले जाईल, याकडे लक्ष लागले होते. याबाबत कारागृह अधीक्षक योगेश देसाई यांनी सांगितले, की कपडय़ाच्या दुकानामध्ये ग्राहकांना साहित्य देण्यासाठी कागदाच्या पिशव्या दिल्या जातात. यासारख्या पिशव्या बनविण्याचे काम संजय दत्तला देण्यात आले आहे. सुरुवातीला त्याला काही प्रशिक्षित कारागिरांकडून पिशवी बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. त्याच्या सुरक्षेचा विचार करता त्याला त्याच्या बराकीतच हे काम करावे लागेल. त्याला एका दिवसासाठी पंचवीस रुपये रोजगार मिळणार आहे.