येरवडा कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा सांस्कृतिक कार्यक्रम तयार केला असून, यामध्ये मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्तही सहभागी होणार आहे. गणेशोत्सवानंतर नागरिकांसाठी हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे.
आधुनिक काळातही महाराष्ट्राच्या संस्कृतीचे महत्त्व सांगणारा हा कार्यक्रम कैद्यांनी तयार केला आहे. यामध्ये नाटिका आणि नृत्य बसविण्यात आले आहेत. परदेशात राहणारा भारतीय व्यक्ती त्याच्या बालपणीच्या मित्राला भेटतो व आपल्या संस्कृतीची माहिती जाणून घेतो, असा या कार्यक्रमाचा गाभा आहे. त्याचे संवाद, नृत्य दिग्दर्शन आदी सर्व कैद्यांनीच केले आहेत. या कार्यक्रमात काम करण्यास तयारी असल्याने संजय दत्तने कारागृह प्रशासनाला कळविले आहे. गणेशोत्सवानंतर हा कार्यक्रम नागरिकांसाठी दाखविण्यात येणार आहे. त्यासाठीचे ठिकाण मात्र अद्याप निश्चित झालेले नाही.