भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांचा घरचा अहेर गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला का काँग्रेसला सत्ता मिळणार, याबाबत अंदाज व्यक्त केले जात असतानाच भारतीय जनता पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी भाजपला घरचा अहेर दिला आहे. प्रस्थापितांच्या विरोधातील वातावरणामुळे भाजप गुजरात निवडणुकीत पराभूत होईल, असा दावा काकडे यांनी केला आहे. तसेच अन्य पक्षांशी हातमिळवणी करूनही भाजपला तेथे सत्ता मिळविता येणार नाही, असेही काकडे यांचे म्हणणे आहे. त्यांच्या या दाव्यामुळे भाजपच्या वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. गुजरात निवडणुकीतील मतदानाचा दुसरा टप्पा पार पडला असून मतदानोत्तर चाचण्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला पुन्हा सत्ता मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र पुण्यातील भारतीय जनता पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी हा अंदाजच चुकीचा असल्याचा दावा केला आहे. ‘भाजप गुजरातमध्ये कित्येक वर्षांपासून सत्तेत होता. यंदा परिस्थिती बदलली आहे. प्रस्थापितांच्या विरोधातील वातावरणाचा फटका पक्षाला बसण्याची शक्यता आहे. तसेच मुस्लीम समाजातील मतदारही भाजपवर नाराज असल्याचे दिसून येत आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना गुजरातमध्ये लक्ष केंद्रित करता आले नाही. त्यातच पटेल समाजाचा नेता हार्दिक पटेल याची सीडी हा मुद्दाही चुकीच्या वेळी पुढे आणण्यात आला आहे. निवडणुकीच्या कालावधीत विकासाच्या मुद्दय़ावर भर देण्यात आला नाही. या सर्व बाबी विचारात घेता निवडणूक जिंकणे अडचणीचे ठरेल,’ असे काकडे यांचे म्हणणे आहे. गुजरात निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर काही व्यक्ती आणि संस्थांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्येही याच बाबी प्रकर्षांने पुढे आल्याचे त्यांनी सांगितले. पुणे महापालिका निवडणुकीनंतर मतमोजणीच्या काही दिवस आधी त्यांनी भाजपला शहरात ९२ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला होता. महापालिका निवडणुकीत भाजपला ९८ जागा मिळाल्या होत्या.