दहावीची परीक्षा सुरू असतानाच निगडीतील ज्ञान प्रबोधिनी शाळेतील प्रथमेश 26cycleसंजय कुचे (वय १६) या सायकलपटू विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाला, शाळेवर शोककळा पसरली, मित्र परिवार दु:खात बुडाला. केवळ रडत बसण्यापेक्षा मित्राची आठवण म्हणून काहीतरी विधायक करू, असा संकल्प प्रथमेशच्या मित्रांनी केला. खूप विचारमंथनानंतर सायकल रॅली, गरजू विद्यार्थ्यांना सायकल व हेल्मेट वाटप करण्याचे ठरले. पैशांची उभारणी करताना मित्रांनी आपापसात वर्गणी काढली, खाऊचे व खरेदीचे पैसे दिले. अनेक अडचणींमधून मार्ग काढत प्रथमेशच्या वाढदिवशीच हा उपक्रम राबवण्याचा निर्धार त्यांनी केला आणि त्यासाठी ते झपाटल्याप्रमाणे काम करत आहेत.
प्रथमेश हा कुचे यांचा एकुलता एक मुलगा. त्याचे दहावीचे दोन पेपर व्हायचे होते. मित्राकडून परतत असताना १९ मार्चला त्याचा अपघाती मृत्यू झाला. खेळाची आवड आणि उत्तम जलतरणपटू अशी ओळख असलेला प्रथमेश राज्यस्तरीय सायकल स्पर्धामध्ये सहभागी होत असे. ‘एनडीए’मध्ये जाण्याचे स्वप्न असल्याचे तो मित्रांना नेहमी सांगत असे. त्याचे स्वप्न अपूर्ण राहिल्याच्या कल्पनेने प्रथमेशचा मित्र परिवार कासावीस होत होता. सात मे रोजी प्रथमेशचा वाढदिवस आहे, त्या दिवशी आठवण म्हणून काहीतरी विधायक करू, असे मित्रांनी ठरवले.
धीरज भामरे, सम्यक साबळे, सौरभ देसाई, अनुराधा निकम, श्रुती तांदळे, मधुरा बुरसे, भार्गवी जोशी, सायली वाढोकर, मानसी रानवडे, नाजनीन शेख, सूरज बलदोटा आदी मित्रांनी या कामात पुढाकार घेतला. चर्चेअंती मुलांची व मुलींची स्वतंत्र सायकल रॅली, गरजूंना सायकल वाटप तसेच हेल्मेटचे वाटप करण्याचे ठरले आहे. जवळपास ८० हजार रुपये खर्च येणार होता. मुलांनी खाऊचे व पॉकेटमनीतील पैसे भरले. ५० रुपये ते हजार रुपये असा सहभाग विद्यार्थ्यांनी घेतला. काहींनी नियोजित मोबाइल, कपडे खरेदी नंतर करू, असे म्हणत ते पैसे दिले. मुले काहीतरी चांगले करत असल्याचे पाहून पालकांनीही मदतीचा हात दिला. शिक्षकांनी पाठबळ दिले. ५० हजार रुपये जमा झाले. अजूनही विद्यार्थी एकेक करत पैसे जमा करत आहेत. प्रथमेशच्या सायकलसाठी ठेवलेले ३५ हजार रुपये कुचे परिवाराकडून देण्यात येणार आहेत. हुरूप वाढला आणि मुलांची भ्रमंती सुरू झाली. परिसरात मिळेल तिथून जुन्या सायकली ते घेऊ लागले. त्या दुरुस्त करून त्याचा गरजूंसाठी वापर करण्यात येणार आहे. काही सेवाभावी संस्थांनी नवीन सायकल खरेदी करून देण्याचा मानस व्यक्त केला आहे. अनेकांनी विविध पद्धतीने या मुलांना मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. सर्वाच्या सहकार्याने सात मे ला होणाऱ्या कार्यक्रमासाठी परवानगी काढण्यापासून सर्व तयारी सुरू आहे. या कार्यक्रमासाठी प्रथमेशचे आई वडील, ज्ञान प्रबोधिनीतील शिक्षक, विद्यार्थी तसेच पालकही उपस्थित राहणार आहेत.