शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे कायमच भाजपाच्या प्रदेश आणि केंद्रीय नेतृत्वावर टीका करताना दिसतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या बहुतांश योजनांच्या विरोधात ते आपलं मत मांडतात. तसेच करोनाकाळात राज्यातील विविध वर्गांची आर्थिक घडी विस्कटली असताना राज्य मदत देण्यास असमर्थ असल्याचे सांगत त्यांनी अनेकदा केंद्राकडे बोट दाखवलं आहे. त्यांच्या या भूमिकेवर भाजपाकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. आलं अंगावर तर ढकल केंद्रावर अशीच संजय राऊत यांची भूमिका असल्याची घणाघाती टीका भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लोकसत्ता.कॉमशी बोलताना केली. ते बुधवारी पुण्यात बोलत होते.

राष्ट्रवादीचे जयंत पाटील भाजपामध्ये? सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया

“संजय राऊत यांच्या पुढाकाराने तयार झालेल्या या सरकारचे वैशिष्ट्ये म्हणजे ‘आल अंगावर तर ढकल केंद्रावर’, ‘आल अंगावर तर ढकल भाजपावर’. या सरकारला स्वतःच कोणतंही धोरण नाही. त्यांना काहीही कामे करण्याची इच्छाशक्ती नाही. महाविकास आघाडीच्या सरकारमधील तीनही पक्षात समन्वय नाही. एक मंत्री एक भूमिका मांडतात. दुसरे वेगळंच काहीतरी सांगतात. ‘ना एकमत ना धोरण’ असा हा प्रकार आहे. संजय राऊत यांचीही तीच भूमिका आहे. स्वतःच्या अपयशाचे किंवा स्वतःच्या मर्यादेचं खापर ते कायम कधी भाजपावर तर केंद्रावर फोडत असतात”, असे टोला त्यांनी लगावला.

परंतु त्याचसोबत, संजय राऊत हे आज उपचारासाठी रूग्णालयात दाखल झाले असून ते लवकरात लवकर ठणठणीत बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो, अशा सदिच्छाही केशव उपाध्ये यांनी व्यक्त केल्या.

रोहित पवारांच्या वर्षभराच्या कामगिरीला किती गुण द्याल? राम शिंदे म्हणतात…

सरकारच्या वर्षपूर्तीबाबत बोलताना ते म्हणाले की तीन पक्षांच्या सरकारसाठी जनता हा त्यांच्यादृष्टीने मुद्दाच नाही. त्यांच्यासमोर केवळ भाजपला रोखणे हाच अजेंडा आहे. त्यामुळे आम्हाला हे सरकार पाडण्यात अजिबात रस नाही. त्या तिघांमध्ये समन्वयाचा प्रचंड अभाव आहे. त्यामुळे यथावकाश सर्वांना जे होईल त्याचं स्पष्ट चित्र दिसेलच!