सर्व भाषांची जननी असलेल्या संस्कृत भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी शहरातील ३२ संस्था एकत्र आल्या आहेत. संस्कृत भाषेसाठी काम करणाऱ्या या संस्था सहकाराच्या माध्यमातून संस्कृत भाषेच्या प्रगतीसाठी ‘राष्ट्रीय संस्कृत दिना’चे औचित्य साधून काम करणार आहेत.
नारळी पौर्णिमा हा राष्ट्रीय संस्कृत दिन म्हणून साजरा करण्याचे धोरण केंद्र सरकारने स्वीकारले असून यंदा ४५ वा राष्ट्रीय संस्कृत दिन साजरा होणार आहे. क्रांतिदिनाचे औचित्य साधून ९ ऑगस्ट रोजी पुणे विद्यापीठातील नामदेव सभागृह येथे सायंकाळी चार वाजता हा कार्यक्रम होणार आहे. आनंदाश्रम, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, संस्कृत प्रसारिणी सभा, डेक्कन कॉलेज, पुणे विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, वेदशास्त्रोत्तेजक सभा, वैदिक संशोधन मंडळ, प्रसाद प्रकाशन, श्री अक्कलकोट स्वामीमहाराज मठ, तळेगाव येथील संस्कृत अध्ययन केंद्र यांसह शहरातील शाळा आणि महाविद्यालये यांचा या कार्यक्रमामध्ये समावेश आहे.
कवी भास यांच्या ‘स्वप्नवासवदत्तम’ नाटकाची रंगावृत्ती असलेला एक तासाचा नाटय़प्रयोग हे यंदाच्या संस्कृत दिनाचे खास वैशिष्टय़ असेल. स. प. महाविद्यालय, फग्र्युसन महाविद्यालय आणि पुणे विद्यापीठातील विद्यार्थी हा नाटय़प्रयोग साकारणार आहेत. संपूर्णपणे संस्कृतमधूनच होणाऱ्या या कार्यक्रमास कोणी अध्यक्ष किंवा प्रमुख पाहुणा नाही आणि कोणाचेही भाषण होणार नाही. या कार्यक्रमापूर्वी संस्कृत प्रसारिणी सभेतर्फे आनंदाश्रम येथे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी संस्कृत पाठांतर स्पर्धा होणार आहे. त्यासाठी २५० विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना राष्ट्रीय संस्कृत दिनाच्या कार्यक्रमामध्ये पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. सहभागी संस्थांपैकी काही संस्था कार्यक्रमाची आखणी करण्यामध्ये योगदान देतात तर, काही संस्था आर्थिक निधीचे साहाय्य करतात, अशी माहिती आनंदाश्रमच्या विश्वस्त डॉ. सरोजा भाटे यांनी दिली.